तळाशीलचा भूभाग खचला.
आचरा | ब्यूरो न्यूज : समुद्राला आलेल्या पौर्णिमेच्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये दहा ते पंधरा फूटाचे अंतर राहिले आहे. यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तोंडवळी तळाशीलचे माजी सरपंच संजय केळूस्कर यांनी केली आहे.
एका बाजूने खाडीने आणि दुस-या बाजूने समुद्राने वेढलेल्या तोंडवळी तळाशील भागाला पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाचा कायमच फटका बसत आला आहे. समुद्राच्या बाजूने दोन टप्प्यात संरक्षक बंधारा बांधण्यात आला आहे त्यामुळे काही प्रमाणात तळाशील भूभाग संरक्षित झाला असला तरी उर्वरित खाडी आणि समुद्र यामध्ये सर्वात कमी अंतर अंदाजे तीस मीटर अंतर असलेला पाचशे मीटर किनारपट्टीचा भूभाग अजूनही संरक्षक बंधाऱ्याविना असल्याने या भागाला उधाणाचा फटका बसत आहे. पौर्णिमेला आलेल्या उधाणाचा फटका या भागाला बसला असून अंदाजे पंधरा फूट किनारपट्टीचा भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे.
तळाशील मुख्य रस्त्यापासून काही फूटावरच समुद्र येऊन ठेपला आहे. त्यामुळे या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना केळूस्कर यांनी सांगितले की तळाशील समुद्र किनाऱ्याच्या संरक्षक बंधाऱ्याचे काम दोन टप्प्यांत झाले आहे. उर्वरीत पाचशे मीटर संरक्षक बंधाऱ्याची गरज आहे. सध्याच्या उधाणामुळे बंधारा नसलेल्या किनारपट्टीचा भूभाग खचत चालला आहे. यामुळे या भागातील पंधरा घरांना धोका निर्माण झाला आहे. या मोसमातील अजून काही उधाणे बाकी आहेत यामुळे तातडीने संरक्षक बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर या भागातील घरांसोबत मुख्य रस्त्यालाही धोका निर्माण होणार आहे. तरी प्रशासनाने याबाबत लक्ष देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)