कुडाळ येथे फणस व्यवसाय विषयक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मराठा समाज भवन येथे फणस उद्योग विषयक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘उद्योगावर बोलू काही…’ या संकल्पनेवर आधारित ‘फणस एक: व्यवसाय संधी अनेक!’ या विषयावर आधारित ही पहिली निःशुल्क प्रशिक्षण कार्यशाळा २१ मे रोजी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचा शुभारंभ शिवसेना नेते, सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना उपनेत्या, माविमच्या माजी अध्यक्षा आणि या कार्यक्रमाच्या संकल्पक डॉ. ज्योती ठाकरे यांनी या उपक्रमाची भूमिका आणि उद्दिष्टे सांगितली. यंत्र उद्योजक तथा उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे यांनी फणस प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली.
या उद्योगासाठी उपयुक्त असलेल्या विविध शासकीय योजना, कर्ज व अनुदान प्रक्रियेची माहिती MCED चे निवृत्त राज्यप्रमुख श्री. सुनिल देसाई यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.
दुपारी ३ ते ६ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेला ५० ते ६० नवउद्योजक महिला व युवक सहभागी झाले. सहभागी प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाची गरज अधोरेखित केली व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी आमदार वैभव नाईक, संपर्क संघटक अपूर्वा प्रभू, जिल्हा युवाधिकारी मंदार शिरसाट, जिल्हा संघटक श्रेया परब यांनी परिश्रम घेतले.
२२ मे रोजी, भवन नाचणे रोड रत्नागिरी येथे अशी कार्यशाळा संपन्न झाली. त्याही कार्यक्रमाला देखिल मोठया प्रमाणावर महिला व युवकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)