कुडाळात आ. निलेश राणेंच्या सूचनेनुसार वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी व त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. आ. राणे यांच्या सूचनेनुसार अनधिकृत बांधकामे तसेच अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने ॲक्शन प्लॅन बनवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली.
कुडाळ शहरामध्ये वाढत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात आमदार निलेश राणे यांनी प्रांताधिकाऱ्यांसह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे निर्देश दिले होते. आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी प्रशासनाची बैठक कुडाळ नगरपंचायत येथे आयोजित केली होती. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पोलादे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, बांधकाम विभागाचे अधिकारी बामणे, एसटी महामंडळाचे अधिकारी वारंग उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम हा कळीचा मुद्दा ठरला. रस्त्याच्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे, त्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी यावर चर्चा झाली. शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्ते याबाबतही चर्चा झाली. या रस्त्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे तोडल्याशिवाय वाहतूक कोंडी आटोक्यात येणे कठीण आहे, अधिकाऱ्यांनी सूचना केल्या. याबाबत सभेमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली याबाबत लवकरच आमदार निलेश राणे यांचा अहवाल सादर करून पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन घेतले जाणार आहे. अलीकडेच कुडाळ पोस्ट कार्यालय येथे डंपर अपघातामध्ये एका इसमाचा मृत्यू झाला होता. वाहतूक कोंडीमध्ये होत असलेले अपघात याबाबतही चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी दूर करायची असेल तर अनधिकृत बांधकामांबरोबरच अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबतही चर्चा झाली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)