झरी.
( संपूर्ण काल्पनिक कथा. )
तिशीपर्यंत येता येता केदार बर्यापैकी सेटल्ड झालेला. नोकरी लागल्यानंतर दोन वर्षांच्या आतच त्याचा वडिलांचा आधार व त्यापेक्षा सहवास नाहीसा झाला होता. आई त्याच्या लहानपणीच गेलेली त्यामुळे स्वावलंबनासाठी वगैरे फारसं न धडपडता तो बाबांसोबत मोठा होत गेलेला. बाबांनी ,’वियोग’ ह्या एकमेव तत्वावर नातेसंबंध जोडायची शिकवण त्याला सहज दिलेली…त्यामुळे खुद्द बाबांच्याही जाण्याने तो दुःखी होऊनही खचला वगैरे नाही..! दुसर्याच दिवशी तो ऑफिसला हजर होता आणि अगदी त्याच्या कामात तितकाच गर्क वगैरे झालेला…सहकार्यांना त्याचं ते वागणं अगदीच ,’ओव्हर पुरोगामी तथा निर्जीव’ वगैरे वाटलं पण बाबांच्या पहिल्या वर्षश्राद्धाला हमसून हमसून रडलेला केदार पाहिल्यावर सहकार्यांना त्याच्या ,’जिवंतपणाची खात्री पटलेली..!” लग्नवगैरेंचा फारसा विचार करणं त्याला आवडायचं नाही. ‘प्रेम’ ह्या स्थितीच्या लांबीबद्दल तो थोडा साशंक होता पण लग्न करुच नये वगैरेचे ठाम निर्धारही त्याला शिवले नाहीत.’सीमा व रमेश देव, ह्रषी कपूर व नीतू सिंग, सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर, रितेश व जेनेलीया देशमुख..’,वगैरे बर्यापैकी लांबलचक सुखी विवाह जोड्यांचं कौतुकही त्याला होतं. त्याच्या त्याच्या परीनं तो त्यांना फाॅलो करायचा प्रयत्नही नक्कीच करायचा..! पण ऑफिसमधले सगळेच सहकारी त्याच्यापासनं थोडं वैचारीक अंतर राखून ह्या विषयावर कधी बोलायचे नाहीत आणि जवळची अशी एक आत्या होती तीही घटफोस्टीत असल्याने तिची काही स्थळं वगैरे आणायची बिशादच झाली नव्हती..! उलट मध्येच कधीतरी आत्याला भेटायला गेल्यावर त्यानेच आत्याला विचारलेलं ,” तुला लग्न वगैरे करायचंय का परत..? तर खरंच सोशल मॅट्रीमोनिअल साईटस् वर तसा शोध घेऊया….बिलकुल काचकुच नको करुस….!”आत्याने लाजून त्याला ,”हट्” म्हणलेलं त्यानंतर कुणाच्याच लग्नाचा विषय वगैरे थेट त्याला शिवला नव्हता.
‘झरी’….ह्या गावाबद्दल असंच कुठेतरी त्याच्या सोशल मिडिया वाचनात आलं होतं.कोकणातील एक शांत निसर्गरम्य गाव..कोणीतरी ललिता नावाच्या ब्लाॅगरने ह्याविषयीचे तिचे अनुभव अगदी एका मिनिटाच्या क्लिपसोबत शेअर केले होते.मनाच्या कोपर्यात ती क्लिप, त्यातला छोटेखानी धबधबा…खाली वहाणारा मोठ्ठा नदीवजा ओहोळ त्याला अगदी हवाहवासाच वाटलेला.त्या ओहोळाच्या कोंडीत सूर मारुन पलिकडच्या बाजुने बॅकस्ट्रोक करत वर येत उगवता व मावळता सूर्य पहायची त्याची इच्छा होती…!पण ती इच्छाच होती !विक एन्ड आल्यावर भरपूर खादाडगिरी आणि झोप ह्यातनं शरीर उचलून कुठे लांब जावं असा त्याचा कुठलाच इरादा कृतीपर्यंत पोचला नव्हता. आठ वर्षे तो नोकरी करत होता. बाव्विशीत मिळवलेला जाॅब हा त्याला सर्वांगाने विकसीत करत आनंद देणारा असल्याने ‘घर,काम आणि घरातलं सगळंच काम’,हा त्रिकोण त्याला मोडववत नसायचा.ऑफिस पार्ट्या व सहकार्यांची लग्नं त्याने समरसून आनंदली होती…पण शहर तथा स्टेशन सोडून वगैरे नाही…! कितीही फिरलं तरी झोप मात्र त्याला स्वतःच्याच बिछान्यावर साजरी करायची हट्टाची आवड होती.मग अशात ,’झरी’ गावाबद्दल मात्र एक ओढ निर्माण झालेली….! ऑफिसला सुट्टी टाकायची गरज नव्हती. शुक्रवार,शनिवार अशा दोन सुट्ट्या आलेल्या..म्हणून कोणाला सांगून तथा परवानगी घेऊन वगैरे कुठं जायचा प्रश्नच नव्हता…त्यात आत्याचाही फोन लागला नाही म्हणून फक्त मेसेज करुन ठेवला त्यानं तिच्या नंबरवर..!
आठ नऊ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर तो वैभववाडी स्टेशनला उतरला…! बर्यापैकी सकाळ झालेली. ‘रेल्वे स्टेशन’चा मोनोटोनस भाग वगळता सगळाच मस्त माहौल होता.आजुबाजुला तुरळक माणसं, पावसाची नुकतीच पडून गेलेली पण ,”पुन्हा येऊ की काय” म्हणणारी सर त्याच्या डोळ्यांना जाणवत होती. रेल्वे स्टेशनचा चहा टाळून तो त्याचा बॅकपॅक उचलत स्टेशनबाहेर आला. स्टेशनपासून मुख्य वैभववाडी गांव , पुढे आत कुठंतरी कुसूर गांव आणि नंतर तिथनं दोनचार किलोमीटरवर कुठंतरी झरी नावाचं गांव किंवा वाडी असल्याची जुजबी माहिती होतीच त्याला पण खुद्द वैभववाडी इतकी मोहक होती की,’ इथेच लाॅज बुक करुन एखादा दिवस काढावा’ असाही विचार त्याला चाटून गेला…! पण,”नंतर बघू काय ते “, असं मनाशीच म्हणत त्याने नाष्ट्यासाठी एका हाॅटेलचा आसरा घेतला.हाॅटेलच्याच प्रसाधनगृहात थोडं फ्रेश वगैरे होऊन तो हाॅटेलच्या मुख्य खिडकीजवळील टेबलला जाऊन बसला. “एक मिसळपाव……आणि दोन बटाटावडे”, अशी जंगी ऑर्डर देत त्याने निसर्गाचं वैभव ओतून ओतून अथक हसणारी वैभववाडी न्याहाळायला सुरवात केली. पावसाळा संपत आलेला, कुठंतरी लांबनं धूपाचा गंध वगैरे येतोय, असा माहौल त्याला तसा नविन होता…त्यात समरसून जात त्याचा चहा नाष्टा कधी उरकला ते कळलंच नाही त्याला..! बिल देऊन लालसर पायवाटेने मुख्य चौकात येत त्याने झरी गावची चौकशी केली.सगळेच रिक्षावाले फारसे आतुर नाही दिसले यायला..! त्यातला एक रिक्शावाला म्हणला,”मी उंबर्ड्याला जाणार आहे..’कुसूर’ गावापर्यंत सोडीन..तिथल्या पळसुले वाडीतनं एक कच्चा रस्ता जातो…मेनरोडवरनच…तिथे कोण रिक्शावाला असेल तर बघा …पण मला आज जास्तवेळ थांबता नाय येणार..घरी कार्य आहे…..!” केदारने हायसं वाटत ,”ठिक आहे दादा….तसं करुया…”म्हणत त्याचा बॅकपॅक रिक्शात ठेवला. आता त्यातनं फोन बाहेर काढत त्याची बॅटरी तपासली तर नव्वद टक्के होती…तो खूश झाला. “मस्त फोटो काढत जाऊ रिक्षातून”, म्हणत तो रिक्शात बसला.सफाईदारपणे रीक्शावाल्यानं कुसूर गावची वाट धरली..!फारसा मोठा व रुंद रस्ता वगैरे नव्हताच..पण विकासाच्या पाऊलखुणा जाणवण्याइतपत स्वच्छ व रेखीव रस्ता जरुर होता.तुरळक पाऊस असल्याने माळरान वजा खडकांवर हरणांची फुलं,छोटी छोटी डबकी व नावही माहीत नसलेल्या शेकडो वनस्पती त्यांच्या पिल्लांसकट मस्त हिरवून पसरल्या होत्या..! मध्येच थांबून फोटो घ्यावा तर रिक्शावाल्याच्या घरच्या कार्याची आठवण झाली त्याला म्हणून त्याने तो विचार टाळत डोळ्यांनी व कॅमेर्याने जमेलतशी फोटोग्राफी चालू ठेवली ..! एक नागमोडी कोकणी वळण पार होताच रीक्शावाल्याने रीक्शा डावीकडे ,’पळसुलेवाडी’ नामक बोर्डजवळ थांबवली..! “हा…! इथनं सरळ जावा…दोनचार पळसुल्यांची घरं आहेत बघा..तिथनं थेट खालच्या बाजुला जायचंय. चालत थोडं लांब वाटेल हो…पण प्रश्न तो नाहीय…प्रश्न परत मागे याल तेंव्हा इथनं वैभववाडीला कसे जाल…? हा आहे..बघा एस टी आहे मध्येच दोनचार वेळा..पण सहाच्या आतच…इथेही थांबतात एस.ट्या….पण हात दाखवलात तरच ओ …!” केदारला रिक्शावाल्याच्या भीतीशी देणंघेणं नव्हतं पण माहिती म्हणून तो सगळं मनापासून ऐकत होता.भाड्याचे दोनशे रुपये देऊन त्याने पळसुलेवाडीचा कच्चा रस्ता पकडला..! पळसुले वाडी एक शांत निसर्गकुशीच वाटली त्याला..! तिथली बहुतेक घरं टुमदार ,कौलारु होतीच पण सोबतच लागून बंद असणारी काही नविन घरंही होती..!एका घरासमोर थांबून चौकशी करत त्याने तो स्वतः ‘झरी’ गावच्या वाटेवर असल्याची खात्रीही करुन घेतलीच.एक अर्धा किलोमीटर चालल्यानंतर एक दणकट बैल त्याच्या साथीला कुठनंतरी रानातनं बाहेर आला..! बैलाची ताकद स्पष्ट दिसत होतीच..पण तो मायाळू वाटला…थोडा भीत भीतच केदार त्याच्या पाठीवर हात फिरवत चालत होता…! बैल कोणाचा व का वगैरे प्रश्न त्याला तेंव्हाच पडला जेंव्हा एक नव्वदीच्या आजी बाई त्यांच्या गाईला हाकवत हाकवत गोठ्याकडे ढकलताना दिसल्या त्याला..! आज्जींचं वय स्पष्ट दिसत असलं तरी थकवा व क्षीणपणा नावालाही नव्हता. त्या आज्जीबाई बैलाला दूरनंच पाहून त्यांच्या गायीला गोठ्यात ढकलत होत्या हे समजल्यावर केदारला ते फार क्यूट वाटून हसू आलं…!आज्जीबाईंनी चालता चालता बैलाला टोमणाही मारला, “गांव नाही हुंदडत माझी चांदी….दावंही बांधत नाही मी…माझ्या परवानगीशिवाय एक पाऊल गोठ्याबाहेर नसतं तिचं”, वगैरे फिल्मी वाटावं इतकं आजीबाई बोलल्या. तो बैलही अगदी ,’होणार्या सासुरवाडी समोरुन जायच्या लगबगीनं “, केदारलाही मागं टाकून पुढे चालत गेला..केदारने हसून त्याला,”आयला..चमन आहेस काय रे..?” असं मजेत म्हणत त्याचा वेग वाढवला. एका पावसाने स्वच्छ झालेली, ‘झरी’ गावची छोटी पाटी येताच केदारला हायसं वाटलं. भूतखेतं वगैरे नाही पण निर्जन कच्च्या रस्त्यावर जंगली श्वापदांची थोडी भीती त्याले मनोमन होतीच. पण त्या चमन बैलासोबत थोडा धीर आलेला.गावात फारशी घरं नव्हती…अर्थात् ,’ब्लाॅगर ललिताच्या’ व्हिडिओत तिनं ते नमूद केलं होतंच..! एक बर्यापैकी आधुनीक वाटणारं घर दिसताच तो तिथं पोचला..बाहेर झोपाळ्यावर वर्तमानपत्र, एक लॅपटाॅप होता . सोबत नुकताच पिऊन झालेला चहाचा कप त्याच्या सायीच्या ओशटपणाला कपाच्या कडेवर विसावून मोक्ष न मिळालेल्या जीवाची अवस्था दाखवत होता म्हणजे कोणीतरी घरात आहे ह्याची खात्री झाली त्याला…तो हाक मारणार इतक्यात एक साठीचे गृहस्थ बाहेर आले. “अरे व्वा….झरी पहायला आलात..?त्या ललिता ब्लाॅगरने छान पोहोचवली ओ झरी सगळीकडे “, असे म्हणत केदारची पुढची मागची संदर्भ संवाद प्रक्रिया हलकी केली..! “होय..काका…म्हणलं थोडं अनटच्ड पहावं…अनुभवावं….!” ते गृहस्थ मस्त हसत म्हणले,”अनटच्ड वगैरे अंधश्रद्धा आहेत झरीबद्दल..आम्ही रहातोच की पिढ्यानपिढ्या….!मुख्य रस्त्यापासून फक्त जरा लांब आहे आणि फॅक्टर्या लागू शकत नाहीत म्हणून अनटच्ड म्हणतात..बाकी मोबाईलला फुल नेटवर्क आहे हो आमच्याकडे..एक शाळा आहे….वाचनालय आहे…दोन दवाखाने आहेत.पण आजार कमी आहेत बाळा …! “बाळा”, या शब्दांतून स्वतःला सोडवून घेत केदार म्हणला,” केदार…केदार नांव आहे माझं सर..त्या ओहोळ आणि कोंडीकडे कसं जायचं ओ सर..?म्हणजे नेमका रस्ता ठाऊक नाही…म्हणून विचारलं..!” त्या गृहस्थांनी केदारला नीट वाट दाखवत जाताना पुन्हा यायची प्रेमळ विनंती केली. केदारने हसून मान डोलवत त्यांचा निरोप घेतला..
‘झरीची कोंड…!’आहाहा..पहाताच कपडे फेकून देऊन लहान मुल बनायची इच्छा होणारा स्वर्ग होता तो..! एक बर्यापैकी आडोसा बघत केदारने थोडंफार शुटींग केलं. तीन हिरव्या टोपीचे डोंगर, त्यातनं बाहेर पडणारा धबधबा, फेसाळती कोंड म्हणजे डोह आणि आधी खळाळून अवखळ होत शेवटी शांत वाहणारा नदीवजा ओहोळ…. मस्त वाटलं सगळंच. शहर,प्रवास अगदी रिक्शाप्रवासही विसरला तो. ह्या सगळ्यात तो ,’चमन’ बैल सुद्धा केदारसोबत साथ देऊन होता. ओहोळाशेजारील ताजं गवत त्याला चरताना बघून केदारला आता भूक जाणवली. “ही शेवटची सूर उडी”,असं म्हणत म्हणत त्याने वीस एक तरी सूर उड्या समारोपाच्या म्हणून मारत ,बॅकस्ट्रोक पद्धतीने पाण्याबाहेर येत डोंगरांचं दर्शन घेतलेलं. सूर्यास्त वगैरे पहाणं शक्य नव्हतंच …म्हणून केवळ ती कल्पना ओलावत तो पुन्हा कपडे चढवून परतीच्या मार्गाला लागला. जाताना त्या गृहस्थांनी दिलेल्या आमंत्रणाची गरज त्याला कळली ती सुसाट भुकेमुळे..! त्याने त्यांच्या घरी केळीच्या पानात वाढलेल्या जेवणाचा छान आस्वाद घेतला.गृहस्थांच्या पत्नीही मायाळूच होत्या..अगदी भरभरुन खीरपुरी तीनदा खात टम्मपणे केदार उठला. बाहेर येतोय तर गृहस्थ व्हिडिओ चॅट करत होते. एक पंचवीशीची मुलगी त्यांच्याशी बोलत होती..केदारला ,”इकडे ये..ही बघ माझी मानलेली मुलगी…!” म्हणत तिची ओळख करुन दिली. “हाय…!मी प्रियांका……!”वगैरे जुजबी ओळख होताच केदारला हे समजलं की त्याच्या ऑफिसच्याच मूळ कंपनीत प्रियांका क्वालिटी कंट्रोल विभागात आहे. “भेटूच तिकडे आल्यावर…बाय..!” म्हणत केदारने काॅल कट करत फोन पुन्हा गृहस्थांकडे सुपूर्त केला. गृहस्थांचा व त्यांच्या घरचा निरोप घेऊन निघेपर्यंत दुपारचे तीन वाजलेले..”सहानंतर एस.टी.नाहीय”, हा संदेश मनात घोळत होताच..येताना त्याची चाल जोर पकडून होती आणि मागोमाग तो चमन बैलही होताच. “आता रेल्वेतपण येणार काय रे..?” असं म्हणत त्याने बळजबरीने त्याला तिथनं रानात जायला लावलं..पाठीवर हात फिरवत ,”धन्यवाद “म्हणत त्याला निरोप दिला. चमन बैल शेपटीनं उगीचच ,”टाटा” करतोय असा भास झाला त्याला..! वाटेत त्या चांदी गायीच्या आज्जींचं घर लागलं. आता त्या आज्जी शांतपणे हसत ,”आलास फिरुन?” म्हणल्या. केदारनेही ,”हो आज्जी…..! मस्त वाटलं तुमची पळसुले वाडी आणि झरी गांव सुद्धा..!” आज्जींनी लांबुनच दृष्ट काढल्यासारखी केली..व पुन्हा घरात गेल्या..झपाझप चालून मुख्य रस्त्याला येताच दोन मिनिटात ,’उंबर्डे वैभववाडी” बस दिसली त्याला. “हात दाखवताच “थांबली…स्वतःला बसमध्ये चढवत वैभववाडी येईपर्यंत दहा मिनिटांची डुलकी काढून तो ताजा झाला. आता आणखी एक दिवस थांबण्यापेक्षा शहरात जाऊन एक दिवस आराम करत सोमवारी ऑफिसला जायच्या इराद्याने त्याने वैभववाडी स्टेशनला जनरल डब्याचंच तिकिट काढलं. ट्रेन स्टेशनला लागताच संपूर्ण दिवसाला व वैभववाडीला अलविदा करत तो आत चढला.
“झरी….?”व्हाॅट धीस झरी डॅड…? दहा वर्षांची पौलमी केदारला विचारत होती…अगं झरी..’तुझी मम्मा आणि मी ‘ पहिल्यांदा भेटलेलो तिथनं. मी झरीतून मम्माशी व्हिडिओ काॅलवर बोललेलो. एक मस्त डेस्टीनेशन आहे गं ते..जाऊ आपण कधीतरी…! “पण मम्मा कधी नाही बोलली तसं ….! “पौलमी विचार करत म्हणाली.”अगं काय काय सांगून गेली असेल तुला..तू सहा वर्षांची होतीस फक्त…प्रियांका गेली तेंव्हा..!” “व्हाॅटएव्हर…….!” म्हणत पौलमी तिच्या ऑनलाईन क्लासेसला जाॅईन होत बेडरुममध्ये गेली.” “अरे..खरंच की..झरीतनं आल्यानंतर, प्रियांका कधीच झरीविषयी काहीच म्हणली नाही. आपणही काहीच चर्चा नाही केली. ओळख होऊन दोनच महिन्यांत रजिस्टर लग्न केलं. पुढे ऑफिस व वर्षातच पौलमीचा जन्म. कधी झरीविषयी काहीच नाही विचार आला..आज त्या मेमरीज कुठे आहेत तेही आठवत नाहीय..!” केदारने दहा वर्षांपूर्वीची दोन दोन जीबीची सगळी मेमरी कार्ड्स कार्ड रीडरमध्ये घालून लॅपटाॅपला चेक केली. झरीचा एकही फोटो त्याला आढळला नव्हता. एक फोटो जरा चक्रावून जाणारा दिसला त्याला. बाबांसोबत त्यांच्या एका मित्राचा फोटो. तो मित्र म्हणजे तरुणपणीचे तेच गृहस्थ जे झरी गावात प्रियांका शी ओळख करुन दिलेले..! ती प्रियांकाची केवळ सोशल मिडिया ओळख होती. पण ते लाडाने तिला ,”मानसकन्या” म्हणत. इतकाच विषय व तेवढीच चर्चा एकदा झालेली प्रियांकाशी..!” “मग हा माणुस बाबांच्या फोटोत कसा…?”असा विचार करत त्याने त्याच्या आत्याला आधी तो फोटो पाठवला..आणि नंतर फोन केला..”अरे हा तुझ्या बाबाचा मित्र…कोंकणातला होता….आधी इकडे शहरात होता नंतर गावी स्थायीक झालेला म्हणजे ह्याचं गाव तिकडे कोकणात कुठेतरी ,’झरी’ की काय ते…..तिथनं रेल्वेचे रुळ जायचे होते….अख्खा गावच सरकारने खाली करायला लावलेला..भरपूर पैसे मिळाले रे..पण हा काही त्यात खूश नव्हता…शेवटी तिथल्याच कुठल्या कोंडीत स्वतःला बुडवून शेवट केला आधी त्याने नंतर बायकोनेपण त्यांच्या…! एक मुलगी होती..तिला शहरात ठेवलेली..प्रियांका नाव होतं तिचं..तिचीही काहीच खबर नाही नंतर….सगळं गेलं रे त्याचं…गांवचा त्याचा बैलही नंतर रेल्वे सुरु झाल्यावर, रेल्वेलाच आपटून गेला असं बाबा सांगायचा तुझा…अगदी तुझा बाबा त्याच्या मुलीच्या शोधातही असायचाच…पण नाही भेटली कधी त्याला ती प्रियांका..तू लग्न केलंस आणि बायकोचं नावही प्रियांका हा योगायोग तुला सांगणार होते…पण म्हणलं उगीच तू काहीतरी गैरसमजशील…चल…..संध्याकाळी बोलू..मी डाॅक्टरकडे जातेय. पौलमीला सांग मी शनिवारी येतेय रहायला..!” फोन ठेवताना केदार पूर्ण लटपटला होता..त्याने आता प्रियांकाचे सगळे फोटो धुंडाळायला घेतले..कुठल्याच फोटोत त्या गृहस्थांचा क्ल्यू नव्हता…!घरातल्या मेडला पौलमीसोबत रहायची विनंती करुन आणि आत्याला डाॅक्टरकडनं थेट पौलमीकडे ताबडतोब घरी बोलवून त्याने गाडी बिल्डिंगच्या बाहेर काढली.
नविन हायवेवरुन सहा तासात केदार वैभववाडीत पोचला…सगळं बदललेलं..पण तरिही परिचयाचं होतं..मुख्य चौकातून कुसूर गावाला वळण घेत तो पळसुले वाडीपाशी आला.गाडी डाव्या बाजुला लावुन त्या कच्च्या पायवाटेवरनं धावत आत जात त्याने झरीची वाट धरली….एकेक गोष्ट त्याला परीचयाचीच होती..तो रिक्शावाला आठवला ज्याच्या घरी त्यादिवशी “कार्य” होतं,ती आज्जी व तिची गाय…..ते घरही दिसलं पण मोडकळीला आलेलं……पुढे जातो तर झरीचा गांव म्हणून मागमुसही नव्हता….! तो डोह, त्या गृहस्थांचा बंगल्याकडे वगैरे कुठनं जावं हेच कळत नव्हतं म्हणण्यापेक्षा तिथं गेली तीस वर्ष काही असल्याचं जाणवतच नव्हतं. झरीच्या वेशीतनंच तो निराश व आश्चर्याने शहराकडे परतला..पहिल्यांदा झरीला गेल्याची तारीख तो आठवू पहात होता…’ब्लाॅगर ललिता’ तर गुगलवर नावालाही दिसत नव्हती ..!
जुन्या कॅलेंडरला शोधताना त्याला एक वेगळीच माहिती समजून गेली…तो झरीला प्रथमच गेला त्या दिवशी ,”सर्वपित्री अमावस्या ” होती. पौलमी प्रियांकाचा फोटो पुसत होती…प्रियांका फोटोतनं समाधानी खट्याळ हसत केदारकडे बघत होती…आणि बाबांच्या फोटोतून त्यांचा झरीतला ‘तो’ मित्र मात्र….कसा तो ‘नाहीसा’ झाला होता…!
लेखक : सुयोग श्रीनिवास पंडित, सिंधुदुर्ग
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)