लज्जारक्षण.
लज्जारक्षण.
( स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्या विशेष लेखन )
भरत गुरूजींनी शाळा भरल्याची घंटा दिली आणि मुलांची वाट बघायला लागलेशाळेच्या वेळेत कोणीच येत नाही म्हणा.गुरूजींनाच वस्तीवर जाऊन पोरं हुडकून आणावी लागतात.
वांदरमारे,भोरपी यांच्या वस्तीवर जायचं म्हणजे आव्हानच. मोठी माणसं कोणी भेटण्याची शक्यताच नाही. चार दोन पोरं मारामारी करत किंवा दगडाचा चेंडू करत खेळताना दिसायची. सुरूवातीला गुरूजींना बघून पोर धूम पळायची. पण हळूहळू गुरूजींनी विश्वास निर्माण केला आणि आता गुरूजी स्वतः गेल्यावर तरी पोरं असतील तशी शाळेत येतात.
" ए उंब-या,अरे चला शाळेला.आज तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट सांगतो."गुरूजी म्हणाले.
गळणारं नाक पालथ्या मनगटानी पुसत उंब-यानं विचारलं,
"त्ये न्हवं गुर्जी.पन खायाला काय भ्येटंल आज ?"
"खायला होय? आज करूया की चांगलं कायतर. चला तर खरं शाळेला."
मग उंब-या, म्हादेव, अर्जुन्या आणि शेकटी अशी चौघं गुरूजींच्या मागून धावायला लागली.
"शक्ती, आज आंघोळ केली नाहीस?" गुरूजींनी विचारलं.
"न्हाय बा. आऊ म्हनली का, येळ नाय आज. उद्याच्याला कर.पानी आनाय पायजी न्हवं का सर्कारी हिरीवरून ?"
"आन् माजं नाव शक्ती न्हाय गुर्जी. शेकटी म्हना शेकटी."
गुरूजी हसले. पटावर त्यांनीच शक्ती केलं होतं. शेकटी हे काय नाव म्हणायचं?
गुरूजींना तसा शक्तीशीच काय एकूणात या पोरांशी बोलताना संकोचच वाटतो.
वांदरमारे कितीक वर्ष गावच्या सड्यावर पालं टाकून राहतात. माणूस उकीडवं बसूनच आत शिरू शकतो अशा उंचीच्या प्लॕस्टीकने शाकारलेल्या झोपड्या. सगळा उघडा कारभार.
मोबाईलच्या जमान्यात हरेक झोपडीत मोबाईल सापडेल. त्यांचे मालक गावात जाऊन मोबाईल चार्ज करून आणतात. पण पोरांसाठी पुरेसे कपडे आणावेत असं वाटत नाही.
बापाचे जुने, मळके शर्ट, टी शर्ट घातले की दुसरं काही घालायची गरजच नाही. तो पार गुडघ्यापर्यंत पोचतात.
चड्डी बनियन, पेटीकोट असलं तर कल्पनेच्या बाहेराची गोष्ट.
गुरूजींनी गावात विचार विनिमय करून या पोरांसाठी आठवडी बाजारातून चड्ड्यांचे जोड, बनियन्स, पोरींसाठी पेटीकोट वगैरे आणले.
नवीन नवीन तर पोरांनी नव्या कपड्यांचा आनंद सेलिब्रेट करायला त्या चड्डीतच बापाचा शर्ट इन केला, पोरींनीही....!
गुरूजींनी कपाळावर हात मारला होता.
ते कपडे रोज धुवून टाकायचे असतात हे कोणाला माहीत?
गुरूजी त्यांच्या पालकांना समजावायला गेले तेव्हा धुवाँधार पाऊस बरसत होता. पालात पाण्याचे लोट.
गुरूजींना कपडे वाळवायची समस्या सुटेना. काही न बोलताच ते परतलेत.
केळेवाडीची जिल्हापरिषद शाळा.
पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात जेमतेम दहा विद्यार्थी.
भरतगुरूजी एकटे शिक्षक.
जन्मदर घटला आणि शाळा ओस पडायची वेळ आली. भरतगुरूजी जीव ओतून शिकवणारे शिक्षक. पण विद्यार्थी शाळेत आसतील तर शिकवणार ना !
मग पालावरची पोरं जबरदस्तीने शाळेत आणावी लागली. नाहीतर शाळा बंद पडेल.
गुरूजी जीवाचं रान करतायत. पोरांना माणसात आणायची धडपड करतायत. जेमतेम साताठ मुलांना जीवनावश्यक सवयी लावण्यापासूनचे धडे देतायत.
पालकांचं सहकार्य शून्य. गुरूजींना पालकांचा संताप येतो.मोबाईल माहितीय पण पोरांना वाढवायची अक्कल नाही.
आपला संताप वांझोटा आहे, आपल्याला पोरांच्या शिक्षणाची गरज आहे. त्याच्यावर आपली भाकरी आणि उद्याचा भारतही अवलंबून आहे या विचारानं गुरूजी संताप गिळतात.
१५ ऑगस्ट.
गुरूजींनी शाळेच्या ध्वजारोहणासाठी आपल्या एका लेखक मित्राला बोलावलंय. तो फोटोही छान काढतो.
पोरांनी पानाफुलांनी शाळा सजवायला मदत केलीय. अंगावर तेच ते मळकट कळकट कफनीसारखे शर्ट. शक्तीची उंची वाढायला लागलीय तर तिला तोही तोकडाच होतो. तिला त्याचं काही नाही वाटत.तिच्या सवंगड्यांनाही नाही वाटत.
गुरूजींनी घरून बायकोचा एक जुना परकर आणून ठेवलाय. शक्तीला तोच घालायला देऊ.
पोरांना वरच्या कपाटातून तिरंगा काढायचं काम दिलंय.
पोरं तशी कामात तरबेज.
चौघांनीही तिरंगा अलगद काढलाय.
ऊंब-या, अर्जुन्या,म्हादेव आणि शेकटी यांनी आबदारपणे तो उलगडून दोन्ही टोकं हातात उंच धरत गुरूजींकडे आणला..!
गुरूजी बघतच राहिले.
पोरांचा गळ्याखालच्या भागात स्वच्छ तिरंगा पसरला होता. खालचे मळकट कपडे दिसतही नव्हते...!
आज पहिल्यांदाच...तिरंग्याने केलेलं हे लज्जारक्षण…गुरूजींना स्वातंत्र्याचा आणखी काही अर्थ लावण्याचे संकेत देत होतं… त्यांच्यातल्या शिक्षकाला आव्हान…!
मोबाईलमधलं गाणं वाजत होतं.
'विजयी विश्व तिरंगा प्यारा…!'
लेखिका : वैशाली पंडित ( ९४२२०४३०२५ )
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.
आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या मह...
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बै...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...