कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर भाजप चे रस्ता रोको आंदोलन मागे
बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजपचे रस्ता रोको आंदोलन
बांदा | राकेश परब :बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरणाचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. गणेश चतुर्थीपूर्वी पावसाळी डांबर वापरून तातडीने खड्डे बुजविण्यात येतील असे कार्यकारी अभियंता छाया नाईक यांशी दिलेल्या लेखी आश्वासनंतर बांद्यातील आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
बांदा-दोडामार्ग हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. पालकमंत्री आणि प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नसल्याने अखेर आज बांद्यात भाजपाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यामुळे या आंदोलनात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील असंख्य भाजप कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. घटनास्थळी पोलीस फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते.
कोकणातील सर्वांत मोठा असा गणेश चतुर्थी चा सण तोंडावर आला आहे आणि अशा वेळी बांदा-दोडामार्ग रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वांरवार लक्ष वेधून सुध्दा याकडे बांधकाम विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे आज क्रांती दिनादिवशी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकार, पालकमंत्री व स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलन सुरू झाले तेव्हा सकाळी सावंतवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यावेळी भाजप आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. शेवटी कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासना शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा माजी आमदार राजन तेली यांनी घेतला. शेवटी कार्यकारी अभियंता छाया नाईक व अधीक्षक अभियंता श्रीकांत माने यांच्याशी राजन तेली यांनी फोनवरून चर्चा केली. सदर रस्ता मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. आणि त्यापूर्वी पावसाळी डांबर वापरुन खड्डे तातडीने भरण्याचे आश्वासन दिले. तसे पत्र राजन तेली यांना लेखी देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास गणेशोत्सवापूर्वी प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा राजन तेली यांनी दिला.
सदरच्या आंदोलनात सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सभापती मानसी धुरी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष नानचे, मनोज नाईक, शेखर गावकर, दादू कविटकर, अजय गोंदावळे, डी. के. सावंत, चंद्रशेखर देसाई, चंद्रकांत जाधव, मोहिनी मडगावकर, मधूकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, बाळू सावंत, राजा सावंत, शामराव सावंत, सागर सावंत, तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, अपेक्षा नाईक, राखी कळंगुटकर, अवंती पंडीत, मंगल मयेकर, समिक्षा सावंत, किशोरी बांदेकर, शाम मांजरेकर, गौरी बांदेकर, विनेश गवस, साई सावंत, प्रविण पंडित, प्रविण देसाई, आनंद नेवगी, अमित परब, केतन आजगावकर, दिलीप भालेकर यांच्यासह भाजपचे दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)