आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हळदीचे नेरूर नं. १ केंद्रशाळेचे काम तात्काळ सुरू.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदीचे नेरूर नं. १ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंदावस्थेत असलेल्या कामांची दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली. अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात करण्यात आली.
रखडलेले शाळा इमारतीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये हळदीचे नेरूर या दुर्गम भागातील गावात १९५२ मध्ये दोन वर्ग खोल्यांची मातीची इमारत शाळेसाठी उभी करण्यात आली होती. बहुधा त्यावेळी ती लोकसहभागातून बांधली असावी, त्या शाळेच्या इमारतीत ६३ वर्ष मुलांनी अभ्यासाचे धडे गिरविले. शाळेची इमारत मातीची असल्यामुळे ६३ वर्षानंतर सहाजिकच ती कमकुवत झाली होती, त्यामुळे त्या इमारतीचे फेब्रुवारी २०२५ मध्ये निर्लेखन करण्यात आले. निर्लेखनानंतर मार्च २०२५ मध्ये त्या इमारतीला जिल्हा वार्षिक २०२४-२५ मधून २ वर्ग खोल्या मंजूर झाल्या. मंजुरीनंतर ठेकेदाराने ती इमारत जमीनदोस्त करून टाकली होती. मात्र नवीन काम सुरू केले नव्हते. त्यातच यावर्षी अवकाळी पावसाने पंधरा-वीस दिवस आधीच हजेरी लावल्यामुळे ठेकेदाराने शाळा इमारतीच्या कामाकडे काहीसे दुर्लक्ष केले. पावसाळा सुरू झाल्यामुळे आता आपल्या मुलांची गैरसोय होणार, आपल्या मुलांची सोय कशी करणार? असा प्रश्न शिक्षक वर्गांना पडला होता. दुसरीकडे पालक वर्गातून सुद्धा चिंता व्यक्त केली जात होती.
अखेर याबाबतची सर्व माहिती आमदार निलेश राणे यांना सोमवार, ९ जून रोजी कुडाळ येथील दौऱ्यात मिळाली. माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी यंत्रणेला शाळेचे काम तात्काळ सुरू झालेच पाहिजे, सक्त सूचना दिल्या. याबद्दल आमदार निलेश राणेंच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)