बापर्डेत मध्यमवयीन इसमाचा आकस्मिक मृत्यू ; तलावात मासेमारीसाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज.
संतोष साळसकर | शिरगांव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे सडेवाडी येथील एका मध्यमवयीन तरुणाचा मासे पकण्यासाठी गेल्या दरम्यान मृत्यू झाला. तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. मयत सखाराम वाघू झोरे (वय ४५ वर्षे ) असे त्यांचे नांव असून ही घटना आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
आज बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तळेबाजार येथील तलावात एका व्यक्तिचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना एका सजग नागरीकाला दिसला. त्यांनी याबाबत पोलिस पाटील मुकेश पारकर यांना कळविले. पारकर यांनी देवगड पोलिस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलिस हवालदार राजन जाधव, महेंद्र महाडिक, अमित हळदणकर यांनी घटनास्थळी जावून पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ रोहीत गांवकर यांच्या सहकार्याने मृतदेह तलावातून बाहेर काढला. यावेळी तळवडे कॉलेज येथे प्राध्यापक असलेल्या प्रा. झोरे यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांनी पाहणी करून हा मृतदेह सखाराम झोरे यांचा असल्याचे सांगीतले. यामुळे मृतदेहाची ओळख पटली.
मयत सखाराम झोरे हे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करीत होते. बापर्डे येथे आई वडीलांसमावेत ते राहत होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांची मुले शिक्षणानिमित्त बाहेरगांवी असून तळेबाजार येथे ते तलावाकडे मासेमारी करण्यासाठी आले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)