कु. निलिमाच्या मृत्युची चौकशी व्हावी म्हणुन आम. भास्कर जाधवांनी अधिवेशनात उठवला आवाज.
कणकवली /प्रतिनिधी गणेश चव्हाण.: कु. निलिमा सुधाकर चव्हाण ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी हिच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी व्हावी यासाठी आम. भास्कर जाधव यांनी अधिवेशनात आवाज उठवला.
नाभिक समाजाची कु. निलिमा सुधाकर चव्हाण, ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेमध्ये नोकरीला होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी दापोली येथून ती आपल्या घरी म्हणजेच ओमळी येथे येण्यासाठी निघाली. दापोली बस स्थानकामध्ये चिपळूणकडे जाणाऱ्या एसटीमध्ये ती बसली. मात्र ती चिपळूणला पोहोचलीच नाही. शोधाशोध करूनही न सापडल्याने तिच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली परंतु पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही. आणि तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न देखील केला नाही. अखेर दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वा. वाजण्याच्या सुमारास दाभोळ, ता. दापोली येथील खाडीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. कु. निलिमा हीचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला ते पाहता हा घातपात असावा, अशी शक्यता जास्त आहे. कारण, तिच्या डोक्यावरील सर्व केस आणि दोन्ही भुवया पूर्ण नष्ट करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्यावर अत्याचार करून आणि नंतर तिला अशा प्रकारे विद्रूप करून खाडीमध्ये फेकून देण्यात आले का? याचाही तपास होणे आवश्यक आहे. मृतदेह सापडून तीन दिवस होत आले तरी गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या गुन्हयाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत करण्याचे आदेश सरकारने, द्यावेत असे निवेदन आम. भास्कर जाधव यांनी अधिवेशनात सरकारला दिले.
नाभिक समाज कन्येच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणुन प्रामाणिकपणे लढणार्या या आमदारांचे, राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार व नाभिक कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)