ध्येय्यपूर्तीचा प्रवास टप्प्याटप्प्याने करा : प्रणय तेली तळेरे येथे नेहरु युवा केंद्राची करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
शिरगाव | प्रतिनिधी: मला जे आवडते, जमते आणि समाजाला ज्याची गरज आहे, ते आपले करियर असून प्रत्येकाने आपले करियर निवडले पाहिजे. आणि ते मिळविण्याचा ध्यास असला पाहिजे. करियरच्या ध्येय्यपुर्तिचा प्रवास टप्प्याटप्प्याने केला की तो सुलभ होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी केले. ते नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि श्रावणी कम्प्यूंटर, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रणय तेली यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, मोटिवेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ, प्रोजेक्ट लिड क्वॉलीटीचे पर्सिस्टंट सिस्टीम प्रसाद पाटिल, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, गवाणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला, श्रावणी कम्प्यूंटरचे संचालक सतिश मदभावे, तळेरे विद्यालयाचे एन. बी. तडवी, तंबाखू प्रतिबंध अभियानच्या श्रावणी मदभावे आदी उपस्थित होते. या करियर मार्गदर्शन कार्यशाळेत विविध विषयावरील वक्त्यांनी मार्गदर्शन केले. मोटिवेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ म्हणाले की, मानसिकतेच्या अभावामुळे अलीकडे काहीजण मागे राहतात. यासाठी यश मिळत नाही, तोपर्यंत थांबणार नाही आणि त्यासाठी विचार, धेय्य आणि नियोजन पक्के असले पाहिजे. त्यासोबतच आयुष्यात पुढे जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर दररोज वाचन केले पाहिजे. प्रमोद जठार म्हणाले की, स्वत:ला ओळखले तर या जगात अशक्य असे काहिच नाही. जगात टाकाऊ असे कोणीही नाही, सर्वच टिकाऊ आहेत. त्यासाठी स्वत:ला ओळखले पाहिजे. यावेळी मार्गदर्शन करताना प्रसाद पाटिल म्हणाले की, आता आयटी शिवाय पर्याय उरलेला नाही. आपण काय करु शकतो याचा विचार करा. आयटीत काम करतानाही कौशल्ये असणे फार गरजेचे आहे. स्वप्न पहा आणि तुम्ही प्रत्येकजण बदल घडविणारे बना. तर संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांची प्रकट मुलाखत सदाशिव पांचाळ यांनी घेतली. यावेळी बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न आणि सातत्य या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यासाठी कोणतेही करियर निवडा त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि कामातील सातत्य असेल तरच तुम्हाला यश मिळू शकेल. असे सांगताना अनेक किस्से आणि त्यामागील प्रेरणा विषद केली. कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रणाली मांजरेकर, सूत्रसंचलन प्रणय हुले तर आभार श्रावणी मदभावे यांनी मानले. या कार्यशाळेला तळेरे दशक्रोशीतील 10 वी व 12 वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)