कांदळगावची श्रीया परब ठरली मिस टुरिझम युनिव्हर्स एशिया...!
पर्यटन दिनादिवशी आलेल्या सुखद वार्तेने सिंधुदुर्गवासियांची मान विश्वात उंचावली…!
विवेक परब | चिंदर :विशेष वृत्त : सध्या जगभरात पर्यटन दिनाची आणि सप्ताहाची धूम सर्वत्र आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. पर्यटनाच्या जागृतीतून व्यावसायिक पर्यटनाला शाश्वत पर्यटनाची सांगड घालून आत्मनिर्भरता आणि स्वयंरोजगार निर्मितीची माहितीही विविध संस्था देत आहेत. अगदी या सर्व उपक्रमांना आता चार चाॅन्द लावायचे खूप आंतरराष्ट्रीय कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका कन्येने केले आहे.
नुकतीक लेबनाॅन येथे २२ देशांच्या आंतराष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स – २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील असलेली श्रीया परब मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ ची विजेती ठरली.
या स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या तिच्या यशाबद्दल पुन्हा एकदा जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळची मालवणची असलेली श्रीया संजय परब ही पहिल्या दिवसापासूनच आपल्या तयारीवर लक्ष देऊन होती. तिच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने आणि सर्वाना घायाळ करणाऱ्या सौंदर्याने इतर सहभागी स्पर्धकांच्या मनात धडकी भरवली होती. अंतिम फेरीदिवशी श्रियाच्या सर्व सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकून घेतली आणि तिने मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ हा किताब पटकावून लेबनाॅनमध्ये तिरंगा फडकवला.
मुंबई येथे ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2021 मध्ये झालेल्या मिस तियाराची विजेती झाली. या स्पर्धेत देशातून विविध स्पर्धक सहभागी झाले होते. विजेतेपद मिळाल्याने लेबनॉनमध्ये झालेल्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायची सन्धी मिळाली. विजेत्या श्रीयाचे नाव ऐकून सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.
2017 मध्ये झालेल्या मिस अप्सरा महाराष्ट्रची श्रीया अंतिम विजेती ठरली होती. तर मिस एशिया पॅसिफिक मध्ये रनर अप हा किताब पटकावला. मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ या स्पर्धेमुळे श्रीयाने देशाचे नाव चमकवले आहे. श्रियाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिचे पालक, तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक ऋषीकेश मिराजकर यांना दिले आहे. ती मुंबईमध्ये आल्यावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रियाच्या ह्या यशाने अनेक तरुण मॉडेल्सना एक आदर्श घालून दिला असून ती अनेक तरुण तरुणींचे प्रेरणास्थान ठरेल यात शंकाच नाही. श्रियाच्या ह्या यशाने फक्त मालवणच नाही, तर समस्त सिंधुदुर्गवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्रिया परब आणि कुटुंबियांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
श्रीयाच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अस्सल आंतरराष्ट्रीय पर्यटन दूत लाभली आहे याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन क्षेत्राला एक नवीन झळाळी मिळाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)