आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
प्रफुल्ल देसाई यांच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या सदस्यपदी निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन.
संपादकीय : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे पत्रकार व पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल देसाई यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या तज्ञ समित्यांपैकी जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती मध्ये सदस्य म्हणून निवड झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
ही संस्था राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची शिखर संस्था असून सन २०२७ मध्ये या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक टप्पा उद्योग-व्यापार विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीमध्ये सदस्य म्हणून प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रफुल्ल देसाई यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे मा. सि. वा. कोकणविभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दिपक परब, ट्रस्ट बॉर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, विजय केनवडेकर आणि विविध मान्यवर सदस्यांसह विविध डिजीटल समूहांतील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोकणात गेली पाच वर्षे डिजीटल मिडियाच्या प्रसारादरम्यान 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर' ह्या संस्थेच्या विविध निवडी आणि नियुक्त्यांबद्दल तसेच ह्या संस्थेच्या विविध घडामोडींबद्दल माहिती मिळत असते. श्री. प्रफुल्ल देसाई यांच्या निवडीचे वृत्त ३० सप्टेंबर २०२६ जागतिक 'भाषांतर' दिनाला सर्वत्र झळकले. श्री. प्रफुल्ल देसाई हे पत्रकारिता, पर्यटन आणि शब्द व शब्दार्थ संशोधन अशा क्षेत्रात गेली चार दशके कार्यरत आहेत. एखाद्या गुंतागुतीच्या संकल्पनेला, सामान्य माणसापर्यंत थेट शब्दात न्यायचे कसब त्यांच्याकडे आहे. आगामी काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांचे लेखन तसेच तळागाळातील माणसांपर्यंतचा थेट व सहज संवाद हे घटक अचूक 'भाव भाषांतर कौशल्य' महत्वपूर्ण भूमिका निभावतील अशी आशा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या विविध संकल्पना, घडामोडी यांची सहज भाषेतून माहिती देऊन, उद्योजकतेचे यथार्थ भाषांतर होईल तसेच कोकणातील उद्योजकतेला एक अर्थपूर्ण दिशा मिळेल या सोबतच सर्वसामान्यांसाठी उद्योजकतेच्या भाषेची समज अधिक विकसीत होईल अशी आशा सामाजिक व औद्योगिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)