विद्यार्थ्यांसाठी १९ नोव्हेंबरला शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर..!
दर्पण प्रबोधिनीच्या वतीने आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी :
शालेेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय कागदपत्रे,जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने आणि तहसिलदार कार्यालय कणकवलीच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन उद्या शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. कणकवली काॅलेज येथील एच.पी.सी.एल. सभागृहात करण्यात आले आहे.दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसंबंधी सातत्याने पुढाकार घेत आलेली आहे. यावर्षी कणकवली तालुक्यातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेसंबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कारण शालेय तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातून येत असतात, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा आणि कागदपत्रांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसिलदार कार्यालयात वेळोवेळी फेऱ्या माराव्या लागतात.
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता सध्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन व्हावे यासाठी कणकवली काॅलेज येथील एच. पी.सी.एल. सभागृहात जात पडताळणी प्रमाणपत्र आणि इतर शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे .सदर मार्गदर्शन शिबीरात तहसिलदार कार्यालय कणकवली येथील अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सदर मार्गदर्शन शिबीरात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, सरचिटणीस सुभाष कदम यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)