विशेष लक्षवेधी...
धान्य दुकानातील नियमित व मोफत धान्य ‘ऑफलाईन’ पद्धतीने वितरीत करण्याची त्वरीत परवानगी द्यावी : नेरुर सरपंच धनंजय गावडे
देवेंद्र गावडे | उपसंपादक : सरकारमान्य रास्त धान्य दुकाने आणि त्यावरील सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे हे काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहेत.
त्यात सध्या सर्वत्र भातकापणीचा हंगाम सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेतक-यांसाठी, ज्येष्ठ नागरिक व बाहेरगावी कामाला जाणारे ग्रामस्थ या सर्वांसाठीच सध्या रास्त धान्य दुकानावर धान्य मिळवणे हे फार जिकरीचे व मनःतापाचे काम होऊन बसले आहे.
‘थंब’ लावून धान्य देण्याची कार्यप्रणाली गेले कित्येक दिवस बंद पडून आहे. त्यामूळे दुकानदार धान्य वितरीत करण्यास असमर्थता दर्शवतात आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. परिणामी सकाळी सात वाजल्यापासूनच लांबच लांब रांगा दुकानावर लागलेल्या दिसून येतात.
परंतू सर्व्हर एरर, सर्व्हर प्राॅब्लेम असल्या कारणांमूळे धान्य वितरीत केले जात नाही. पर्यायाने हा सगळा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
‘आनंदाचा शिधा’ वाटप करताना ‘सर्व्हर प्राॅब्लेम’ असतानाही ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिधा वाटप करण्याची जी तत्परता शासनाने दाखविली तीच तत्परता आता देखील दाखवून ‘नियमित व मोफत’ स्वरूपाचे धान्य ‘ऑफलाईन पद्धती’ने वितरीत करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे पत्र ग्रामपंचायत नेरूरच्यावतीने सरपंच श्री धनंजय उर्फ शेखर गावडे यांनी आज जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग व तहसिलदार कुडाळ यांना दिले आहे.
सर्व्हर बंद राहील त्यावेळेस ग्रामस्थांना ‘नियमित व मोफत’ स्वरूपातील धान्य ‘ऑफलाईन पद्धती’ने वितरीत होणे व सर्वसामान्यांची ससेहोलपट थांबणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरताना दिसत आहे.
देवेंद्र गावडे (उपसंपादक,आपली सिंधुनगरी चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)