कणकवलीत संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ ; आमदार वैभव नाईक झाले सहभागी.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात “नफरत छोडो, संविधान बचाओ” अभियाना अंतर्गत संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ झाला.
जिल्ह्यात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही पदयात्रा शहरातून गोपुरीच्या दिशेने रवाना झाली. यात्रेदरम्यान संविधानप्रेमींनी बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व गोपुरी आश्रमातील कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात संविधानप्रेमींनी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’, ‘संविधान एक परिभाषा है, संविधान एक अशा है’ यासह अन्य घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या संविधान बचाव पदयात्रेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा बँकेचे संचालक, नगरसेवक सुशांत नाईक, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे, प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक, अभिनेता नीलेश पवार, सुंगधा साटम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, महेश तेली, माजी जि.प. सदस्य नागेश मोरये, विनायक मेस्त्री, ॲड. मनोज रावराणे, विजय सावंत, रामू विखाळे, रुपेश आमडोसकर, निसार शेख, सचिन आचरेकर, प्रशांत वनसकर,महानंदा चव्हाण, संजय राणे, विनायक सापळे, सचिन चव्हाण, मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पदयात्रेत मुंबई स्थीत परंतु मूळ सिंधुदुर्गचे लेखक श्री.नितीन साळुंखे उपस्थित होते.
त्यांनी या पदयात्रेविषयी सांगितले की देशात प्रत्येक नागरिक सध्या अस्वस्थ आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून दैनदिन गरजाभागवून पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र, महागाईच्या मुद्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच देशात दोन व्यक्तींच्या कंपनीचे सरकार असून या सरकारच्याविरोधात आपल्या आक्रोश व्यक्त करण्यासाठी संविधानिक आयुधांचा वापर करून जनतेने आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन लेखक नितीन सांळुके यांनी केले.
त्याचबरोबर ॲड. मनोज रावराणे,ईशाद शेख,नीलेश पवार यांनीही आपले विचार मांडत संविधानाचे महत्त्व विशद केले.तसेच संविधान बचाओ मोहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले. यावेळी नामानंद मोडक यांनी भगतसिंग यांनी लिहिलेले पत्र यावेळी वाचून दाखविले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)