प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माहिती विषयक मुख्याधिकारी यांच्याकडे मनसे पदाधिकारी यांचे निवेदन सादर.
शिरगांव / संतोष साळसकर :
पंतप्रधान आवास योजने मधून मंजूर झालेल्या घरकुला संबंधी असलेल्या ठप्प कामाचा अहवाल मिळण्याबाबतचे निवेदन मनसे पक्षाच्यावतीने देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, तालुका सचिव जगदिश जाधव,शहराध्यक्ष सचिन राणे आदी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, सन २०१९ – २० मध्ये शासनामार्फत देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील गरीब गरजू ग्रामस्थांकरीता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर केली होती आणि सदर घरकुल योजना नगरपंचायती मार्फत बांधून देण्याची त्यावेळी हमी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे मंजूर झालेल्या ग्रामस्थांकडून आगाऊ रक्कमही घेतली गेली होती. तरी आता एवढा कालावधी लोटला तरी त्या गरजू लोकाना घरे का मिळालेली नाहीत ? सदर घरकुले बांधण्याकरिता नेमण्यात आलेले ठेकेदार कोण ? मंजूर झालेली रक्कम किती ? आगाऊ रक्कम ग्रामस्थांकडून किती घेतली गेली ? ठेकेदाराने सदर काम अर्धवट कशा करिता ठेवले ? ठेकेदाराला आजपर्यंत किती रक्कम पोच झाली ? ती कोणकोणत्या तारखांना झाली आणि आता किती देणे बाकी आहे. या सर्व बाबीची तपशीलवार माहिती म्हणजेच या योजनांचा संपूर्ण अहवाल आम्हाला तात्काळ मिळावा आणि हे काम बंद ठेवण्याचे मूळ कारण काय ? याचाही मुद्दा नमूद करावा, काम पूर्ण करण्याची मुदत लिहावी, तसेच सदरील काम अर्धवट स्थितीत असल्याने त्यातील कॉलमच्या (स्टील) शिगेला पकडलेला आहे तरी त्याची त्वरित माहिती मिळावी असे या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)