पेढा आणि शर्यत.!
“नारायण ….और पचास किलो लगेगा ….दो घंटेमे…”, असा हरीभाईंचा आवाज फोनवर येत होता.
हरीभाईंच्या दुकानात तुंबळ गर्दी उसळली होती. ज्याला त्याला फक्त पेढे हवे होते. शोकेसमधले बिस्किटपुडे,केकस्,माहीम हलवे व इतर सगळेच ,आजच्या बाॅससमोर म्हणजे छोटुश्या पेढ्यासमोर नतमस्तक होऊन जणू जळफळत, काचेला तोंडं टेकवून बसत म्हणत होते,”काय दिवस आलाय आज…..आम्हाला काय किंमतच नाय ओ….अरे आम्ही पण गोडच आहोत…चविष्टही आहोत…आमच्यातले काहीजण तर मस्त नटूनसजून चकचकीत आहेत . तरी त्या टिचभर पेढ्याचीच हौस तुम्हाला…आं…!”
बाराव्वीचे निकाल लागले होते. गावात सगळीकडे छानपैकी आनंद पसरला होताच. गावच्या चारही काॅलेजचा एकही विद्यार्थी व विद्यार्थिनी नापास नव्हती झाली हा एक विक्रमाचाच दिवस होता. गावात यंदा,जवळपास हजार बाराशे असे ,पिटर व रिपीटर होते . सगळेच पास झालेले आणि त्यातले सहाएकशे जण तर मस्त पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण…उरलेल्या सहाशेपैकी भरगच्च गुणवाले शंभर आणि ‘पास होउन गगनाला हात लागलेले’ विस्मयचकित पाचशे….असे सगळेच महाखूश होते आपापल्या परीनं…
तासाभरानं दुकानाचा टेंपो आला. हरीभाऊंचा मुलगा, नारायण स्वतः टेंपो चालवत आलेला. पटापट बाॅक्स पॅकिंग करत एकेक गिर्हाईक हातावेगळं करुन पैसे देण्याघेण्यात तो हरीभाऊंसोबत थांबून राहीला. हा पन्नास किलोचा लाॅट दहा मिनिटांत संपला आणि नारायण पुन्हा टेंपो काढून घरच्या कारखान्याकडे रवाना झाला…..
पुढील गिर्हाईकांना ,”तासभर थांबा हा…..मुलगा गेलाय आणायला पुन्हा पेढे…..!” असं सांगत सोबतच्या हीरा नामक मुलाला दुकानावर लक्ष ठेवायला सांगून हरीभाई मोकळा श्वास घ्यायला दुकानासमोरील रस्त्याला पार करुन समोरच्या बागेत गेले….एका शांतशा, पाऊस न गळणार्या शेडखालील बाकावर ते बसले. त्याचं मन, दोन वर्षांपूर्वीच्या दहावी निकालाच्या दिवसापर्यंत पोहोचलं.
अशीच तुंबळ गर्दी उसळली होती तेंव्हा. आणि आजपेक्षाही अंमळ बरीच मुलं तेंव्हा दहावीत यशस्वी झालेली…पेढ्याच्या ऑर्डर पूर्ण करता करता नाकीनऊ आलेली…काही खास व रोजच्या गिर्हाईकांनाही पुरले नव्हते पेढे तेंव्हा…..नंतर हलवाई आचारी तासभर रुसून बसलेले कारखान्यात….. ! प्रत्येकी दोन हजार पगारवाढीसाठी…..!
जवळपास वीस कर्मचारी व घरचे दहा जण ह्या ताळमेळांत महिन्याकाठी अचानक् प्रत्येक हलवायाला दोन हजार प्रमाणे बारा चौदा हजारांचा कायमचा ताण वाढणार होता तरी हरीभाईंनी निकालाचा दिवस जपण्यासाठी व गिर्हाईकांच्या सेवेखातर ती पगारवाढ मान्य करुन दिवस घालवला होता. केवळ हाच त्रास कमी की काय म्हणून आणखी एक मनःस्ताप वेगळा सहन करावा लागत होता त्यादिवशी….!
हरीभाऊंचा मुलगा नारायण हाही त्यावर्षी दहावीत होता. कसेबसे चाळीस टक्के मिळाले म्हणून हरिभाऊ त्याच्यावर भयंकर चिडले होते. नारायणला घरातून थेट दुकानावर कामाला बोलवून घेत त्यांनी जाता येता नारायणला लोकांच्या ,”अरे..नारायण….तू पण दहावीत होतास ना..तुला किती टक्के पडले….?”ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला उभं केलं होतं…. सगळ्या यशस्वी गुणवाल्या विद्यार्थ्यांना दुःख लपवत हरिभाऊ शुभेच्छा देत होते आणि प्रत्येक मुला गणिक कुत्सिततेने नारायणकडे कटाक्ष टाकत होते…
भयंकर घटनात्मक व अध्यात्मिक गुन्हा केल्यासारख्या चेहर्याने नारायण खजिल होऊन व वडिलांच्या आज्ञेने गोड गोड पेढे बाॅक्समध्ये भरुन “तोलून” देत होता. हलवायांची नाटकं वाढल्याने दुकानही थोडं लवकर बंद करुन हरीभाऊ स्वतः टेंपो चालवत घरी गेले आणि अयशस्वी नारायणला चाळीस टक्क्यांची शिक्षा देत चालत यायला लावलं त्यांनी….!
सगळा दिवस आठवला त्यांना….आणि ते शहारले.आपण रागात टेंपो घेऊन घरी गेलो व सरळ झोपेची गोळी खाऊन झोपी गेलो….नंतर नारायण कधी आला ते आजही नाही माहीत आपल्याला…की त्याची गरजच नाही वाटली कधी. उलट तो आला पेक्षा आला नसता तर….? काय केलं असतं आपण. मुलासोबत त्याला सर्वात अत्यावश्यक दिवशी आपण राहीलोच नाही….दहावी म्हणजे काय हे त्याला कुठे होतं माहीत..? दहावी तर आपली होती खरी…बालपण वेगवेगळ्या हलवायाच्या हाताखाली जमिन पुसत मोठं होता होता त्या त्या दुकानच्या खिडकीबाहेर दिसणारी गणवेश घातलेली मुलं बघत आपण स्वतःची कीव करत मोठे झालो…..ह्या गावात श्रीकृष्ण कृपेने स्थीर होताच दुकान घेतलं…घर बांधले…व कारखानाही उभारला छोटासा…! मुलाला म्हणजे नारायणला गावच्या सर्वात उत्तम इंग्लिश शाळेत घातलं……त्याच्या प्रत्येक दिवसावर करडी नजर ठेवली….दोन ट्यूशन्स लावल्या…बोर्नव्हिटा ,बूस्ट सारख्या शेकडो बरण्या ओतल्या त्याच्या दुधाच्या कपात……!
का केलेलं ते….? फक्त दहावीत चांगल्या मार्कांसाठी..?का स्वतःला न मिळालेल्या बालपणासाठी…….त्या गणवेशांसाठी..त्या दप्तरासाठी की त्या न मिळालेल्या वह्यापुस्तकाच्या गंधांसाठी..?
हरीभाइंना उत्तर मिळत जात होतं. दहावी, यश वगैरे मनात कधीच नव्हते जेंव्हा नारायणला शाळेत घातला होता. नंतर मार्क्स…. टक्के वगैरे इज्जतीचे शब्द ऐकायला येऊ लागले तसतशी आपली बालपणची भूक त्वेषाच्या लालसेत बदलत गेली. आपण जुजबी अक्षरं वाचूनही आज यशस्वी व्यावसायिक आहोतच की…मग नारायणचे चाळीस टक्के हे तर सोन्याहून पिवळे आहेत….त्याला वस्तू देताना आपण मार्क बिर्क अटी कुठे घातलेल्या….घातल्या असत्याच तर त्याने त्या वस्तू व सोयी स्विकारल्याच नसत्या….उलट चाळीस टक्के मिळाल्यावर आपणच आनंदाने दोन पेढे गिर्हाईकांना देत त्याचं कौतुक केलं पाहिजे होतं….ते न करता आपण बिचार्याला आरोपी बनवून घरापर्यंत भर पावसात चार किलोमीटर चालत यायला लावलं….जेंव्हा त्याला बापाच्या कडेवरुन घरी जायची खरी गरज होती…!
नंतर आता दोन वर्षे, नारायण कोलुला जुंपल्याप्रमाणे राबतोय आपल्या दुकानासाठी……सकाळी चारला उठतोय…हलवायांसोबत स्वतः पदार्थांची सुरवात करतोय…पहिले समोसा व ढोकळ्याचे लाॅट बनवून टेंपोतून इतर माल भरत दुकानावर येतोय….स्वच्छता करत दुकान व गिर्हाईक सांभाळतोय..नंतर आपण नऊनंतर येतो…..आणि पाठवतो त्याला बॅन्केत सी.सी.चे व्यवहार करायला…पदोपदी ,”दहावीत इंग्लिश शाळेत चाळीस टक्के मिळालेत ना..मग भर इंग्लिशमध्ये चलनं व पावत्या”,हे रोज मोठ्याने ऐकवतो त्याला……एकदाही पोरगं उलटून काहीच नाही बोललं ओ…!
“छे..आपण फार चुकलो..त्याला काॅलेजलापण नाही घातला….थेट दुकानात चार नोकर कमी करुन आपलाम्हणत म्हणत जुंपला त्याला धंद्यात…स्वतःचा फायदा बघत…मारवाडीपणाला जागत….हट्..!”
बाकावरुन उठताना हरीभाईंनी मनोमन निश्चय केला की नारायणला ह्या कामातून मुक्त करायचं व त्याची इच्छा असेल तर काॅलेज नाहीतर कुठला कोर्सबीस करायला दोनचार वर्ष मुक्ततेची द्यायची……! बागेतल्या नळावर तोंड धुवून चेहरा पुसत, चष्मा लावून हरीभाई दुकानात परतले. एक वेगळाच आनंद आतल्या आतच त्यांना होत होता. दोन वर्षांपूर्वी गिर्हाईकांना तोंडं देताना दमलेले हरीभाई आज त्यामानाने जास्त आर्डर असूनही पूर्ण ताजेतवाने होते..सगळं नारायण शिकून हाताळू लागला होता म्हणून तर हे शक्य होतं….रोज शक्य होत होतं…गेल्या वर्षभरात तर झोपेची गोळी खाऊन झोपी जाणंही बंद झालेलं हरीभाईंचं…!
आज त्याना नारायणला त्याच्या दहावीच्या यशाचा पेढा भरवायचा होता..खरंतर ते दहाव्वीचं नसून एखाद्या मॅनेजमेंट पदवीचं यश होतं….इथर बारावीला असलेल्या मुलांच्या एक दिवशीय आनंद जल्लोषाचे पेढे बनवणार्या व बाॅक्समध्ये भरणार्या मुलाचे मार्कस् हे कुठल्याही गुणपत्रिकेत छापून मावणारे नाहीतच असा यश विश्वास आता नारायणबद्दल वाटू लागला त्यांना.
टेंपोचा आवाज येताच आधीच अधीर झालेले हरीभाऊ उतावीळपणे बाहेर येऊन नारायणला बाॅक्स उतरवायला मदत करु लागले. नंतर हीराच्या ऑर्डर्स यादी प्रमाणे त्यांनी ते नीट रचून व नावं लिहून ठेवली…आता कोणाला पेढे मिळणार नाहीत असं नव्हतंच….हीरा तसा खूप जुना कर्मचारी होता….तीशीच्या आसपासचा असेल …तसा जवाबदारही होता ..सायंकाळ होताच देवाला उदबत्ती लावून हरीभाऊंनी नारायणला हाक मारली,”चल नारायण..आपण जाऊ घरी…हीरा येईल बंद करुन दुकान…चल..चल लगेच..!”
थोड्या साशंक नजरेने नारायणने हरीभाऊंकडे पहात विचारले, “नक्की ना…? तब्येत वगैरे ठीक आहे ना पप्पा? नायतर डाॅक्टर पंकज कडे जाऊया…!”
“अरे तब्येत एकदम मस्त…जय श्रीकृष्ण…! धंदापण बघ लाखभराचा झालाय….आं…! चल चल..जाऊया..!”
थोड्या अनपेक्षीत लवकर घरी जाण्याने नारायण गोंधळला आणि हरीभाईंचा असा मूड व बोलणं त्याहून अजब वाटलं….! ते गल्ल्याविषयी आनंदाने सांगताना तो प्रथमच ऐकत होता…..
हीराशी दोन गोष्टी तो बोलत असतानाच टेंपोची चावी घेऊन हरीभाऊ कधीचे टेंपो चालू करुन हाॅर्न मारत बसले होते…
नारायण टेंपोत बसला आणि हरीभाईंनी शीळ घालत टेंपोचा फर्स्ट गीअर टाकला….काहीतरी वेगळं घडतंय किंवा घडणार हे नारायणने जाणलं होतं..पण काय ते कळत नव्हतं. घरी जायच्या वाटेवर देवीचं देऊळ होतं.त्याच्या आवारात टेंपो नेत हरीभाई आणखी खूश होते. देवीचं दर्शन झाल्यावर सभामंडपात दोघे बसले. लहानपणी कधीतरी एकत्र दोघे आलेले इथे त्याची आठवणही झाली नारायणला….
थोडा घसा खाकरुन हरीभाऊ हसत हसत पण डोळे भरुन बोलू लागले,” अरे,नारायण….तुझे अभिनंदन बाळा…..काॅलेजला नाय गेलास म्हणून काय झालं…तू पण बारावीचा झालास आज….दहाव्वीपर्यंत गेलाचस की शाळेत…ते थोडीच कमी होतं….? आज दिवसभरांत लाखाची ऊलाढाल केलीस तू बाबू….सगळ्या यशस्वी मुलांचा आनंद तुझ्याच पेढ्याने साजरा झाला बघ……
पण मला माफ कर बाळा……मी चुकलो रे..!” आता हरीभाईंचा बांध फुटला…आता नारायणसमोर लहान मुलासारखे ते रडू लागले..,”ते चाळीस टक्क्यावरुन खूप वाईट वागवलं रे मी तुला…..भर पावसात चालवत आणलं घरी…..कशाचाच नाय विचार केला…फक्त स्वतःच्या इज्जतीचा विचार केला…जी इज्जत मलाच कधी नाय कळली त्या खोट्या इज्जतीचा विचार केला रे मी……दोन वर्ष…..दोन वर्ष तुला काय हवं काय नको ते विचारलं पण नाही रे मी…..
आता..आता…ना मी चुक सुधरणार माझी….तुला कुठल्याही काॅलेजात जायचंय तर सांग…मी करतो तिकडे तुझी ऍडमिशन ..अकरावीसाठी… नायतर कुठला कोर्सबीस असेल तर बघ मुंबईत..? मस्त हाॅस्टेल लाईफ नायतर एक फ्लॅट घेऊया छोटासा…..मजा कर….पण आता मिठाईच्या दुकानातून सुट्टी हा तुला……पैसे वगैरे चिंता नको करु….मी हाय ना ..जपून ठेवलंय सगळं…तुझ्यासाठी..फक्त सांगितलं नव्हतं रे कधी…त्या चाळीस टक्क्यांनतर….खूप पैसा ठेवलाय तुझ्याच शिक्षण आणि जीवासाठी…….बाळा!”
नारायण गंभीर झाला…..हरीभाईंचा हात पकडत बोलू लागला….,”चुकताय तुम्ही..दोन वर्ष नाय तर मोजून सहा वर्ष तुम्ही मला काय हवं आणि काय नको हे विचारलंच नव्हतं पप्पा…!”
हरीभाई अवाक् होऊन नारायणकडे पहात होते…नारायण आणखी गंभीर होत बोलू लागला, “ती सहा वर्ष आणि हा आजचा दिवस तुम्हाला मला काय हवं ते कळलंच नाही. पप्पा…..चौथी नंतर मला शाळेतच जायचं नव्हतं. अनेकदा मी खोटं आजारी पडूनही तुम्ही ते नाही जाणू शकलात….पप्पा,मला ना नेहमी दुकानाचं काहीतरी काम करावंसं वाटायचं….शाळा सुटल्यावर करीन म्हणलं तर तुम्ही दोन दोन ट्यूशन्स लावून ठेवलेल्यात…..नीट आजारी पडीन तर रोज दूधं काय आणि बोर्नव्हिटा काय चालू ठेवलेलीत …..मार्कस् मिळवायचे खूप प्रयत्न करायचोच मी..पण ते तुमच्या आनंदासाठी….माझ्यासाठी नाय काही. मला तर तुमच्यासोबत हीरा कसा असतो ना तसं रहायचं होतं…लोकं मला खूप आदराने,” हरीभाईचा मुलगा”म्हणतात तो हरीभाई पहायचा होता…….
दहावीत कमी मार्क मिळाले तेव्हा मी आतून घाबरलेलो जरुर….कारण आता तुम्ही बारावीला चांगले मार्क हवेत म्हणून ट्यूशन्स वाढवाल व अपेक्षापूर्तीसाठी माझा जीव गुदमरवाल म्हणून…..!
पण तुम्ही तर मला सरप्राईजच दिलंत….!
जे मला हवं होतं ते मला न मागता दिलंत..आज मी सगळी मिठाई शिकलो….बॅन्केतले व्यवहार शिकलो…..लोकांशी बोलणं चालणं शिकलो….आणि महत्वाचं म्हणजे तुमचा लहानपणापासून न मिळालेला भरभरुन सहवास मिळाला..मिळतोय मला पप्पा….
ही दोन वर्ष मी नारायण……त्याला हवं तेच जगतोय तर आत्ता कुठनं सुचतायत तुम्हाला हे कोर्स व काॅलेजं..
मला शंका आलेलीच की काहीतरी बिनसलंय तुमचं…..
पप्पा…ओ मी खूप सुखी आहे आता…..नका लोटू परत त्या माझा हरी नसलेल्या दुनियेत मला…….! अहो माझ्या मिठाई बनविण्याच्या व्हिडिओच्या शंभर एक मुली फॅन्सपण आहेत..म्हणजे भविष्यात लग्नाबिग्नाचेही तशे वांदे नाय हो होणार…. .आ..”
हरीभाऊ चाट् पडून व आ वासून नारायणमधल्या स्वतःतला कुशल मिठाई हलवाई व धंदेवाला पहात होते..व तोही खुश असलेला हलवाई……!
मुलाला पश्चात्ताप म्हणून शिक्षण पेढा भरवायला गेलेल्या हरीभाईंचं नारायणनेच समज देऊन तोंड गोड केलं होतं….
देवळाबाहेर पडताना हरीभाऊ न सांगता टेंपोच्या क्लीनरसाईडला बसले. हरीभाईना जाणीव होत होती की टेंपोच्या व एकूणच जीवन भविष्याच्या चाव्या नारायणकडे छान पैकी आपसूक सोपवल्या गेल्यात….दोन वर्षांपूर्वीच….!
( काल्पनीक )
लेखक : सुयोग पंडित ©Suyog Pandit.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)