ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
टक्के 'वारीचं' मृगजळ…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

टक्के 'वारीचं' मृगजळ…!

प्रकाशन: 09 Jun 2022 10:08 AM
वाचन संख्या 137

देवेंद्र गावडे | संपादकीय: कोल्हापूर बोर्ड’ नावाचं मुखपृष्ठ उतरलं आणि ‘कोंकणचं विभागा’चं बावन्नकशी ‘टॅलेंट्’ झळाळून संपूर्ण जगाच्या समोरं आलं.

परिक्षा माध्यमिक असो वा उच्च माध्यमिक..’कोंकण विभाग अव्वल’..ही आता केवळ बातमी राहिली नाही तर ती ‘सवय’ बनून गेलीय.

महागड्या कोचिंग क्लासेसचे चोचले न परवडणा-या कोंकण विभागातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमी असणा-या वीद्यार्थ्यांनी आपल्या जबरदस्त ‘बौद्धिक’ क्षमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शालेय शिक्षकांच्या किंवा स्थानिक शिक्षकांच्या अधिकच्या शिकवणीच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेलं हे यश अगदी निर्भेळ तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या शाळेची, आपल्या शिक्षकांची, आपल्या पालकांची मान ताठपणे उंचावणारं, प्रतिष्ठा वाढवणारं असं हे दैदिप्यमान यश आहे. मुख्य म्हणजे त्यामध्ये सातत्य आहे.

Article image

कोंकणच्या ‘हूशारी’वर कधीच कुणाला शंका नव्हती. फक्त ही ‘हूशारी’ दूस-याचं एखाद्या ‘लेबल’खाली घोषित केली जात होती एवढंच.

कोंकणची यशस्वी परंपरा कायम राखणा-या आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं शिक्षण अगदी नेटाने पूर्ण करणा-या विद्यार्थी-विद्यार्थीनींच कौतुक करावं..अभिनंदन करावं तेवढं थोडचं आहे.

कौतुक, पेढे, अभिनंदन, शुभेच्छा संदेश, स्टेटस् वगैरे सर्व झाल्यावर, तो यशाचा कैफ थोडा उतरल्यावर आत्तापर्यंतच्या ‘सिलॅबस्’मध्ये नसलेला किंवा जाणवून सुद्धा थोडासा बाजूस सारून ठेवलेला प्रश्न अगदी ठळकपणे ‘कोंकण’च्या आणि विशेषतः ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समोर येऊन उभा ठाकतो तो म्हणजे..

..आता पूढे काय ??

अनेक शक्यता पडताळल्या जातात, मार्गदर्शन, सल्ले दिले-घेतले जातात..निर्णय होतो आणि पून्हा एक स्वप्नांना गवसणी घालण्यासाठीची एक ‘दौड’ सुरू होते.

आणि कालांतराने..याचसाठी केला होता का अट्टाहास ??

असा प्रश्न उभा रहातो.

आपली मुलं ‘गुणवत्ते’च्या बाबतीत कधीच कमी नव्हती. मग आपण त्यांना ‘गुणां’च्या..’टक्के’वारीच्या जाळ्यात जखडून टाकून, तेवढंच उद्धिष्ट असतं कि काय आयुष्याचं अस भासवून एका अंधा-या वाटेवर आणून सोडून तर देत नाही आहोत ना ?? हा खरा प्रश्न आहे.

मधल्या काळात तर ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ने जी काही ‘टक्के’वारीची उधळण विद्यार्थ्यांवर केली, त्याने तर अचंबितच व्हायला झालं.

शिक्षण संपत..गुणांनी भरलेली प्रमाणपत्र हातात येतात आणि जेंव्हा हाच आपला ‘गुणवंत’ विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांच्या गेटमधून बाहेर ख-या जगात प्रवेश करतो तेंव्हा त्याला जे वास्तवाचं भान येतं ते स्विकारणं हे त्याच्यासाठी जास्त आव्हानात्मक असतं.

कारण हे सगळं यशाचं गाठोडं घेऊन..बोजाबिस्तरं बांधून सगळ्यात आधी ‘करिअर’ नावाच्या नविन ‘उद्धिष्टा’च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सोडावं लागतं..ते आपलं घर..!!

आपली नाती..आपली माती..आपली ओळख..आपला गाव..आपलं कोंकण..आपला सिंधुदुर्ग..

सर्व..सर्व काही इथेच मागे सोडून त्याला ‘शहरा’कडची वाट धरावी लागते..

कारण त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात ‘करिअरच्या संधी’ नाहीत..!!

चाकरमान्याच्या पेन्शनवर उदरनिर्वाह करणारा प्रदेश हे चित्र काही अंशी बदललंय अस जरी मान्य केलं तरी हजारोंच्या संख्येने विविध शाखांमधून पदवीधर होणा-या..कौशल्य साध्य करणा-या ‘गुणी’ विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यात त्यांना यथायोग्य ‘करिअरच्या’ पर्यायाने रोजगाराच्या संधी का उपलब्ध होऊ नयेत ?? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

सुजलाम् सुफलाम् असणारा..नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असणारा आपला जिल्हा आपल्याच मुलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही ??

औद्योगिकरणाच्या नावाखाली भुखंड संपादित करून उभ्या राहिलेल्या एम्.आय्.डी.सी.ज्..औद्योगिक क्षेत्रे रोजगारनिर्मितीसाठी ‘असमर्थ’ ठराव्यात ??

सामाजिकदृष्ट्या यावरं आवाज उठवला..कितीही वैचारिक काथ्याकूट केला तरी एक गोष्ट पक्की आहे कि या ‘रोजगार निर्मिती’च्या बंद दरवाजाच्या किल्ल्या या शासनाच्या पर्यायाने राजकिय सत्तास्थानांच्या हातात आहेत.

केवळ ‘गुणवंतांचा गुणगौरव’ करून, टाळ्या वाजवून कौतुक-अभिनंदन करून आता भागणार नाही.

ही उदासिनता झटकून टाकून याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.

समाजाच्या प्रत्येक स्तरावरून याविषयी प्रयत्न व्हायला हवेत.

तेंव्हाच हे कोंकणातलं ‘टॅलेंट’ कोकणातचं राहून कोंकणच्या विकासात्मक प्रक्रियेत योगदान देऊ शकेल.

अन्यथा ही भरघोस ‘टक्के’वारी आमच्या ‘गुणवंत विद्यार्थ्यां’च्या ‘करिअर’च्या दृष्टीने एक ‘मृगजळ’चं ठरेल.

देवेंद्र गावडे (संपादक
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स