<em>चाफेड गावठण येथील श्री कुलस्वामिनी मंदिराच्या वर्धापदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा सत्कार</em>…!
शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील श्री कुलस्वामिनी मंदिराचा ३९ वा वर्धापनदिन सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या गावठण भागात गेली कित्येक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत होता.त्यासाठी गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नळपाणी योजना सुरू झाली त्यानिमित्त त्यांचा मुंबई मंडळाच्या वतीने शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या वर्धापनदिनी सकाळी गंगा आणून जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती आणि दुपारी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गेली कित्येक वर्षे गावठण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागत असे.याबाबत ग्रा. प. सदस्य महेश राणे आणि ग्रामस्थांनी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख यांच्याकडे कैफियत मांडली असता खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून या गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुमारे ३० लाखाची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. यासाठी सहदेव मोंडकर यांनी विनामूल्य जमीन दिली. तसेच सरपंच सौ. संचिता भोगले, ग्रामपंचायत सदस्य महेश राणे,पत्रकार संतोष साळसकर,प्रदीप घाडी,प्रकाश मोंडकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष प्रवीण राणे यांनी वेळोवेळी सहकार्य दिले. या मंडळातर्फे मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा राणे, रमेश राणे, लवू राणे,दशकांत राणे,विशाल राणे, पंढरी राणे, माजी पोलीस पाटील आबा राणे,दिनेश राणे,संजय राणे,शाखाप्रमुख उदय राणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर,आनंद मोंडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक रमेश राणे यांनी तर सूत्रसंचालन आभार विशाल राणे यांनी मानले त्यानंतर रात्री ‘सौभाग्य नाही तर रेडा नाही’ हा दशावतारी पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)