कोमसाप मालवण आयोजित राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर....!
चिंदर | विवेक परब : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने वसुंधरा दिना निमित्त आयोजित चैत्र पालवी या काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. स्पर्धेत श्री. दौलतराव राणे, आचरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे मानकरी वराड येथील सौ.सेजल संतोष परब या ठरल्या तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी कुडाळ येथील सौ.अनघा नेरूरकर या ठरल्या.
विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कविवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनी या स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्पर्धेसाठी निसर्ग कविता हा विषय देण्यात आलेला होता. सध्या निसर्ग चक्रामध्ये अमुलाग्र असा बदल होत चाललेला आहे. पृथ्वी तापायला सुरुवात झाली आहे. कोकणचेही तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार जावू लागलेय. आलेली चैत्रपालवी करपून जाईल की काय ही धडधड निर्माण झालीय. मानव आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ होणे यासाठी महत्त्वाचे आहे. ते अनुबंध पुन्हा निर्माण करणारी आपली कविता असावी असे आवाहन कोमसाप मालवण च्या वतीने करण्यात आलेले होते. या विषयावर वेगळ्या कवीनी आपले साहित्यिक विचार कवितेतून मांडले.
स्पर्धेचे परीक्षण श्री. एकनाथ गायकवाड व श्री रामचंद्र कुबल यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जागतिक वसुंधरा दिन या दिवशी संपन्न झाला. यावेळी श्री. माधव गांवकर व स्वराशा कासले यांनी निसर्ग गीत सादर केले.
“निसर्ग आणि मानव यांचा अनुबंध जपणाऱ्या अनेक कविता या स्पर्धेच्या निमित्ताने सादर झाल्या. निसर्ग आपणास भरभरून देतो. त्याचं ऋण मानवाने फेडले पाहिजे. निसर्गाची जपणूक केली पाहिजे, हा संदेश कवींनी श्रोत्यांना दिला. याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे,” असे उद्गार प्रसिद्ध कवी श्री. रुजारिओ पिंटो यांनी यावेळी काढले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री. विजय देसाई यांनी सहभागी कवींचे कौतुक केले.
“नानाविध रत्नांची खाण असलेली आपली वसुंधरा ही ईश्वराची एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. मात्र भौतिक प्रगतीच्या जोरावर मानव वसुंधरेचे शोषण करण्यास निघाला आहे. चैत्रपालवी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागी स्पर्धक व यशवंतांचे कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचे संयोजन श्री गुरुनाथ ताम्हणकर, श्री अनिरुद्ध आचरेकर आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)