गावपळण…आपल्या जिल्ह्याची..!युवा चॅलेंजर ( भाग ४ था )
लेखन : रोशन चिंचवलकर (पळसंब,सिंधुदुर्ग)
तुम्हाला ‘गावपळण’ माहिती आहे का?… बऱ्याच जणांना ती माहिती असेलच.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात गावातली लोकं दर चार वर्षांनी एकत्र जमतात. गावातल्या ग्रामदैवताचा कौल घेतला जातो. कौल मिळाल्यानंतर या तारखेपासून त्या तारखेपर्यंत असे चार दिवस ठरवले जातात.
‘गावपळणा’च्या काळात गावातील सर्व माणसे गुरे-ढोरे, कुत्रे-मांजरी, कोंबड्या व पाळीव पक्षी यांच्यासह तीन दिवस पुरेल इतके धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे व पैसाअडका आदी गोष्टी सोबत घेऊन जातात. ग्रामस्थ कौल मिळाल्यानंतर जागा पक्की करण्यासाठी शेजारच्या गावात, नदीकिनारी अथवा वेशीवरच्या माळरानावर (सड्यावर) जाऊन झोपडी किंवा राहुटी उभारणीच्या कामाला लागतात. गावपळणाच्या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण गावात नेहमीच्या वर्दळीऐवजी स्मशानशांतता पसरलेली असते.
ही झाली संस्कृती, परंपरा. पण गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावातून अशीच माणसं गाव सोडून जात आहेत. कधी कुटुंबाला घेऊन तर कधी म्हातारी आईला मागे ठेऊन. या गावपळणीचे अनेक उद्देश आहेत.
खरं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर सिंधुदुर्ग जिल्ह्यापुढील एक गंभीर प्रश्न आहे. जिल्ह्यातील स्थानिक असेच दरवर्षी शहरांच्या दिशेने जात आहेत. पण कायमस्वरूपी तिथेच घरोबा करण्यासाठी. मग पुन्हा गावात कायमचं यावं की नको, हा देवाचा सोडा स्वतःच्या मनाचा कौल देखील त्यांना घेता येत नाहीय. आता तुम्ही म्हणाल स्थलांतर तर सगळीकडेच होतं, त्यात वेगळं काय? बरोबर, इतक्या वर्षात बऱ्याच जणांचं बऱ्याच ठिकाणावरून स्थलांतर झालंच आहे की ! पण या स्थलांतराला एक सीमा हवीच ना? कोरोनाच्या काळात कोकण पट्ट्यातून हजारो कामगार इतर राज्यात आपल्या घरी गेले. हजारो आले तर होते ना?
मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक जनता, इथले पालक, इथल्या स्त्रिया या जिल्ह्याबद्दल काय विचार करतात यावर सर्व अवलंबून आहे. शिक्षणाची जिल्ह्यातील स्थिती पाहता, निदान माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर आहे. पण पुढे काय? आमच्याकडे प्राथमिक, माध्यमिक पाया आहे. त्याचं पुढे काय?एकतर मुलं लगतच्या कॉलेजमध्ये जातात किंवा शहराचा रस्ता धरतात. पर्यटन आणि उद्योगांच्या बाबतीतही तेच. दोघांची अवस्था ही प्राथमिकच.
सर्वच नकारात्मक मांडण्याचा किंवा भासवण्याचा अट्टाहास नाही. पण बहुतांश शहरात झालेल्या कमाईतून बांधलेली घरे, त्या संबंधित बांधकाम व्यवसाय, वाळू उपसा, चिरेखाणी, हंगामी आंबा आणि काजू यापलीकडे सध्या तरी आपण जाऊ शकलेलो नाही ही सध्या तरी वस्तुस्थिती आहेच. असे अनेक न संपणारे मुद्दे आणि प्रश्न जिल्ह्यासमोर आहेतच.
स्थलांतर हा मानवी जीवनाच्या जगण्याचा एक भाग असतोच. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील तो भाग होता आणि राहील. मुंबई, पुणे या शहरांशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक नाळ जोडलेली आहे आणि राहिल देखील. पण या शहरांवरील अवलंबित्व सिंधुदुर्ग जिल्ह्याने कमी करायला हवं. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रेम, आकर्षण बऱ्याच जणांना आहे. परंतु, हा जिल्हा टिकावा, वाढावा यासाठी सर्वांनीच आपले आर्थिक, सामाजिक, राजकीय योगदान तेवढंच अविरत अगदी दर्याच्या पाण्याइतकच देणं गरजेचं आहे. तरच ही ‘पळण’ काही प्रमाणात का होईना थांबेल. गावांत खऱ्या अर्थाने समृद्धी येईल. आपल्या सारख्या युवा वर्गाने या सक्रिय सहभागासाठी तयार राहायला हवे.
सळसळत्या रक्ताच्या तरुणांनो, तयार आहातच ना..एक असेही युवा चॅलेंजर बनायला..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)