बाळ मुणगेकर कालवश..
शिवसेनाप्रमुखांच्या असंख्य छबींना कॅमेर्यात टिपलेला व पेन्सीलने रेखाटलेला कलाकर्मी हरपल्याने कला व राजकीय जगतात हळहळ.!
मुंबई | ब्युरो न्यूज : शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेबांच्या असंख्य आठवणी आपल्या कॅमेरात टिपणारे सुप्रसिद्ध पेन्सिल चित्रकार व ज्येष्ठ छायाचित्रकार, चित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि मनमिळावू स्वभावाच्या श्री. बाळ मुणगेकर यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेबांचा निष्ठावंत जेष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती.
बाळ मुणगेकर हे ‘अचूक छायाचित्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. मासाहेब यांच्या विविध भावमुद्रा आणि शिवसेनेच्या इतिहासाच्या खुणा आपल्या कॅमेऱ्यातून ४५ वर्षे टिपणारे ज्येष्ठ असा त्यांचा नांवलौकीक होता. स्वाभिमानी, स्पष्टवक्ता आणि आपल्या कलेवर संपूर्ण विश्वास असणार्या महाराष्ट्रातील कलाकारांच्या यादीत त्यांचे नांव आदरपूर्वक घेतले जाते.
कोरोनाच्या महामारीने गेली दोन वर्षे बाळ यांना आर्थिक समस्येलाही तोंड द्यावे लागले असे सूत्रांकडून समजते . किडनी व रक्तदाबाच्या व्याधीने ते त्रस्त होता आणि त्यात त्यांचे निधन झाल्याची माहिती समाज माध्यमांतून मिळाली आहे.
आपल्यासारखेच आणखी चांगले छायाचित्रकार घडावेत हा त्याचा ध्यास होता. त्याकरीता त्याने पुढाकार घेऊन १९९४ साली प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी मुंबईत ‘फोटो अकॅडमी’ची स्थापना केली होती. त्या माध्यमातून ते नवोदित छायाचित्रकारांना फोटोग्राफीचे प्रशिक्षण देत होते.
रायगड किल्ल्याच्या वेगवेगळ्या बाजुंनी तथा दृष्टीकोनाने काढलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचा त्यांच्याकडे खजिना होता.
बाळ यांच्या निधनाने एका उत्तम छायाचित्रकाराबरोबरच एक सौजन्यशील, आपल्या सहकाऱ्यांसाठी संघर्ष करणारा, सौंदर्य दृष्टीचे सखोल ज्ञान असणारा, प्रचंड बुद्धिमत्ता, कधीही न खचणारा, वादळातदेखील खंबीरपणे उभा राहणारा, स्वतःपेक्षाही इतरांना महत्त्व देणारा, युवा पिढीला प्रोत्साहीत करणारा सृजनशील कलावंत माणुस हरपल्याने महाराष्ट्रातील कला,राजकारण व सर्वच सामाजिक क्षेत्रातून तथा विविध सामाजिक मंचांवरुन हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)