कणकवली रोटरॅक्ट क्लबतर्फे बाजारपेठेत तृषाशांती. (विशेष)
कणकवली | प्रतिनिधी : सामाजिक स्तरावर ‘जल ही जीवन है…किंवा वाॅटर बेल’ हे उपक्रम सध्या जगात सर्वत्र अत्यावश्यक उपक्रम म्हणून विशेष आयोजीत करावे लागतात. धकाधकीच्या जीवनशैलीत वेळोवेळी ‘पाणी पिणे’ ही प्रक्रिया किंवा कृतीसुद्धा मानवी जीवनासाठी किती गरजेची आहे यावर शालेय मुलांसाठी जागृती केली जाते. निर्जलीकरण तथा डिहायड्रेशनमुळे शरीरातील ऑक्सीजनची मात्रा खाली येऊन विविध व्याधींचीही शक्यता असते.
या सर्वांवर एक कृती जागृती किंवा तृषाशांतीची एक सेवा कणकवली बाजारपेठेत करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित ‘तृष्णा पाणपोई’ हा उपक्रम काल कणकवली येथील मंगळवार आठवडी बाजारात राबविण्यात आला. या उपक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर तसेच पांडुरंग पारकर, नमिता घाडीगांवकर, निखील पांगम, सुजय जाधव, साक्षी चव्हाण , नम्रता गांवकर व इतर रोटरॅक्टर सहभागी झाले होते. या उपक्रमा दरम्यान सर्व रोटरॅक्टर्सना चांगले अनुभव आले.
बाजारात आलेल्या, तहानलेल्या माणसांनी पाणी पिल्यानंतर कृतज्ञतेचे शब्द आणि चेहर्यावरील समाधान सर्व रोटरॅक्टर्सना दिले. त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्व रोटरॅक्टर्स देखील आनंदित झाले. या उपक्रमांमध्ये रोटरॅक्टर्सनी दोन ठिकाणी तृष्णा पाणपोई ची व्यवस्था केली होती. एक पाणपोई कणकवली ढालकाठी या ठिकाणी व दुसरी पाणपोई झेंडा चौक येथे उभारण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत मंगळवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांना, वयोवृद्धांना, महिलांना, लहान मुलांना, भाजी विक्रेते , शाळकरी मुले , मजूरवर्ग यांना पाणपोई उपक्रमांतर्गत मोफत थंड पाण्याची सोय करण्यात आली. या उपक्रमातून जवळजवळ २०० लिटर पाण्याचे वाटप करण्यात आले. मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांसाठी व भाजीविक्रेते यांना कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली. “तृष्णा पाणपोई” उपक्रमा मध्ये डॉक्टर विद्याधर तायशेटे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच या उपक्रमासाठी रमेश मालवीय (रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल), कणकवली नगरपंचायत इत्यादींचे सहकार्य लाभले. “तृष्णा पाणपोई” हा उपक्रम दर मंगळवारी म्हणजेच कणकवली आठवडी बाजारा दिवशी पार पडेल असे आश्वासन रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर यांनी दिले.
या रणरणत्या उन्हात शरीरातील पिण्याच्या पाण्याची पातळी कायम रहावी व आरोग्यविषयक संदेश देण्याचा या उपक्रमाच्या उद्देशाचे व रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)