कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा 'जाणता राजा प्रतिष्ठान' आंबडोसने केला यथोचित सन्मान...!
शिवजयंती निमित्त आंबडोसवासीयांचा आदर्शवत उपक्रम.
चौके | अमोल गोसावी : मालवण तालुक्यातील आंबडोस येथील जाणता राजा प्रतिष्ठान आंबडोस यांच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून कोरोना काळात आंबडोसवासियांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सायंकाळच्या सत्रात बागायत येथील डॉक्टर डॉ. संजय खोत, चौके येथील डॉ. शरदचंद्र काळसेकर, व डॉ. स्मिता पोळ या डॉक्टरांनी कोरोना काळात प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंबडोस वासियांना वैद्यकीय सेवा दिली त्याबद्दल कृतज्ञता म्हणून प्रतिष्ठान तर्फे या तीनही डॉक्टरांचा सन्मानपत्र, भेटवस्तू , शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक धानजी चव्हाण यांचाही चांगल्या सहकार्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. खोत म्हणाले की, ” कोरोना आजाराने सारे जग थांबवले. आमचे खाजगी दवाखानेही बंद केले. तरीही डॉक्टरांचे कर्तव्य म्हणून आम्ही रुग्णांची सेवा केली. त्यामुळेच सर्व लोकांचा आशिर्वाद लाभला आणि मी स्वतः सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही बरा झालो.”
डॉ. काळसेकर म्हणाले की, आंबडोस गावाने या पंचक्रोशीला चांगली रत्नरुपी माणसे दिली या गावातील लोकांनी आमच्यावर दाखवलेल्या प्रेमापोटीच आम्ही या महामारीवर मात करू शकलो. ” तसेच यावेळी डॉ. पोळ यांनीही मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात आंबडोस गावातील शिवप्रेमींनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन ज्योत प्रज्वलित करून घेतली आणि पायी चालत आंबडोस येथे आणली. श्री देव रवळनाथ मंदिरानजिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील ज्योत प्रज्वलित करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य लोकांनी उपस्थिती लावली.
या सोहळ्या निमित्त १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस वक्तृत्व स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूहगीते, समूहनृत्य आदी कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देउन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी संजय परब , अमित परब, प्रशांत कदम , बंटी कदम, गुरू कदम , सुभाष नाईक , ओंकार नाईक, प्रविण मराळ योगेश नाईक, दिपक परब, धनंजय नाईक , अक्षय पवार, केशव नाईक, प्रकाश परब, अमित परब, संकेत नाईक, रमेश परब यांनासह देवस्थानचे सर्व मानकरी आणि गावातील सर्व आबालवृद्ध यांची साथ लाभली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)