दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी लोकचळवळीची गरज!
वनक्षेत्रातील दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन कार्यशाळेचे कुडाळला आयोजन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वन परिक्षेत्र कार्यालय कुडाळ येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत “वनक्षेत्रातील दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन” या विषयावर कुडाळ वनपरिक्षेत्रा मार्फत क्षेत्रीय कर्मचारी यांचेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांबू, दुर्मिळ वनस्पती अभ्यासक श्री. मिलिंद पाटील (एम एस्सी – फॉरेस्ट्री) यांनी पश्चिम घाटातील दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक वनस्पतींबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या पिंगुळी येथील रोपवाटिके मध्ये क्षेत्रीय भेटी दरम्यान विविध दुर्मिळ वृक्ष प्रजातींची ओळख करून देण्यात आली.
दुर्मिळ व संकटग्रस्त स्थानिक वनस्पतींच्या संवर्धनाबाबत लोकचळवळ होणे काळाची गरज झालेली आहे. या मध्ये सर्वांनी आपलं योगदान देणं महत्वाचं आहे असे मनोगत व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यशाळेस वनपरिक्षेत्र कुडाळ व सामाजिक वनीकरण कुडाळचे अधिकारी व कर्मचारी तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे विद्यार्थीही उपस्थित होते.
सदर कार्यशाळा उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याची माहिती कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)