आरोग्य विभागाच्या "त्या पदांची" फेर परीक्षा २८ नोव्हेंबरला..!
चुकीच्या प्रश्न पत्रिकेचा १० संवर्गातील परीक्षार्थीं हकनाक झाले त्रस्त..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राज्य शासनाच्या आरोग्य विभाग कडून गट ‘क’ साठी घेतलेल्या परीक्षेतील १० संवर्गाना चक्क चुकीच्या प्रश्नपत्रिका दिल्या गेल्याचे सिद्ध झाल्याने सदर विद्यार्थ्यांची फेर परीक्षा आता २८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. न्यासा कम्युनिकेश यांनी घेतलेल्या या परीक्षेत प्रारंभा पासून सावळा गोंधळ झाला होता. आधी परीक्षेची ठरलेली तारीखच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रद्द केली होती. पर जिल्ह्यातील बहुतांश परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचलेले असताना आदल्या दिवशी रात्री परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती.त्यामुळे मोठा गदारोळ सुद्धा उठला होता. शासनाने सुद्धा सदर चूक एजन्सीची असल्याचे कारण देत जबाबदारी टाळली होती.
फेरपरिक्षार्थीची यादी वेबसाइट वर उपलब्ध असेल.
आता गट क मध्ये चुकीची प्रश्न पत्रिका मिळालेल्या विध्यार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार यादीतील उमेदवारांची फेर परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी नाशिक, पुणे, लातूर, आणि अकोला या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांना न्यासा कम्युनिकेशन कडून वितरित करण्यात येणार आहेत.
फेर परीक्षा ४० प्रश्नांची व ५० मिनिटांची असणार आहे.
२४ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या परीक्षेमध्ये प्रत्येक सत्रा मध्ये सर्व पदांसाठीचे ६० प्रश्न सारखे होते. त्यामुळे त्याच सत्रातील वेगळ्या पदाची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांचे बाबत फेर परीक्षेची काठिण्य पातळी समान रहावी यासाठी ४० प्रश्नांची फेर परीक्षा ५० मिनिटांची वेळ देऊन घेण्यात येणार आहे. तसेच वेगळ्या सत्रातील प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांसाठी सारखे प्रश्न नसल्यामुळे समान काठिण्य पातळी असलेल्या १००प्रश्नांची फेर परीक्षा घेण्यात येणार आहे.
गट ड च्या निकालाला सुद्धा ब्रेक लागणार आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गट ‘क’ व गट ‘ड’ या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत घातलेला सावळा गोंधळ संपण्याची चिन्हे दिसत नसून गट ‘क ‘ मधील काही पदांच्या लेखी परीक्षा पुन्हा घेणार असल्याचे आरोग्य विभागाने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे यापूर्वी जाहीर केले होते. तर गट ड मधील विविध पदांच्या परीक्षां बाबत पोलीस अहवाल आल्या नंतर पुढील प्रक्रिया होणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले होते.
गट क मध्ये १२ संवर्गांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये सांख्यिकी अन्वेषक, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ लिपिक, दंतयांत्रिकी, वीज तंत्रि, कुशल कारागीर, क. तांत्रिक सहाय्यक, अवैधकीय सहाय्य क, दूरध्वनी चालक, लघु टंकलेखक, यांच्या फेर परीक्षा तर अधिपरिचरिका व औषध निर्माण अधिकारी या पदांचे निकाल न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती मुळे राखून ठेवण्यात आले आहे.
फेर परीक्षेत तरी चुका टाळाव्यात म्हणून गट क मधील ५२ सवर्गाच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. २४ ऑक्टोबर रोजी गट क मध्ये झालेल्या परीक्षांच्या तात्पुरत्या उत्तर तालिका प्रसिद्ध होऊन अंतिम निकाल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली असे १० संवर्ग आहेत.त्यांची पुन्हा फेर परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरू झाली असून या दहा संवर्गातील मुलांच्या परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. आता होणाऱ्या परीक्षेत तरी निदान चुका होऊ नयेत अशी उपरोधिक टीका परीक्षार्थी विध्यार्थ्यांमधून होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)