हिंदुजा हॉस्पिटलच्या संतोष परब यांचा राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान..!
देवगड जवळील वाडा गावचे आहेत रहिवासी..
मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील वाडा येथील मूळ रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते तथा मुंबई येथील प्रसिद्ध हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे संतोष राजाराम परब यांचा मुंबई येथे आरोग्य विभागात गेली २५ वर्षे केलेल्या कार्याची दखल घेऊन हिंदुजा हॉस्पिटलच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हिंदुजा हॉस्पिटलच्या ट्रस्टी श्रीमती उषा रहेजा मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ श्री गौतम खन्ना, सी. ओ. ओ. श्री जॉय चक्रवर्ती, एच. आर. डायरेक्टर जगदीप चॏहान, ए. आर. श्री सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती उषा रहेजा म्हणाल्या, संतोष परब हे आरोग्य विभागाचे भूषण आहेत. गेली पंचवीस वर्ष त्यांनी केलेले काम, रुग्णांसाठी दिलेली सेवा याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. संतोष परब हे गेली पंचवीस वर्ष मुंबईमध्ये आरोग्य विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. गोरगरीब रुग्णांसाठी ते अहोरात्र झटत आहेत. कोरोना कालावधी मध्ये संतोष यांनी कोरोना योद्धा म्हणून अतिशय चांगली सेवा लोकांना दिली होती. मुंबई मध्ये सर्व स्तरावर त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली होती. त्यांच्या या विविधांगी अशा कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या साठी संतोष यांना त्यांची पत्नी सौ शामल संतोष परब यांचीही योग्य अशी साथ मिळाली आहे. संतोष परब हे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेली वीस वर्षे भारतीय कामगार सेनेचे खजिनदार म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच गेली पाच वर्षे हिंदुजा हॉस्पिटल क्रेडिट को-ऑप सोसायटी मध्ये ते संचालक आहेत. सिंधुदुर्गातील अनेक गोरगरीब रुग्णांना ते मुंबईमध्ये आरोग्याची चांगली सेवा देत आहेत. सिंधुदुर्ग मधील अनेक गोरगरीब रुग्णांचा औषधोपचाराचा ही खर्च मोफत केलेला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)