बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारकडून अत्यावश्यक संच वाटप योजना.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना देण्यात आलेला असून आता महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वितरण योजनेस मान्यता दिली आहे.
या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोठी (क्षमता २५ किलो), धान्य साठवण कोठी (क्षमता २२ किलो) , बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता १ किलो) (एसएस २०२), चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता ५०० ग्रॅम) (एसएस २०२), प्युरिफायर (१८ लिटर) या वस्तूंचा समावेश असून लवकरच या संदर्भातील शासन स्तरावर निविदा प्रक्रिया कार्यवाही राबवून गणेशोत्सवापूर्वी कामगार बांधवांना लाभ देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले आहे.
प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांनी रिसर्च प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच वितरण केले जाणार आहे. याशिवाय नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती शिवसेना कामगार नेते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली असून गोरगरीब कामगारांचा संवेदनशीलपणे विचार करून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)