चाफेड - कणकवली जिल्हा मार्गालगत गवताखाली भगदाड..!
जागरुक ग्रामस्थांनी भगदाड हेरले ; संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ; साळशी वटेश्वर मंदिर नजिकच्या मोरीची दुरावस्था ठरतेय वाहतुकीला धोका..!
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
चाफेड – कणकवली मार्गालगत एका मोरी वर भले मोठे भगदाड पडले असून वाहतुकीला धोकादायक ठरत आहे. चाफेड – कणकवली जिल्हा मार्ग क्रमांक १५ या मार्गावर वटेश्वर स्थळ या ठिकाणी असलेल्या मोरीला हे भगदाड पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते तसेच वावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा देखिल निर्माण होतो ती महत्त्वाची असलेली ड्रेनेज व्यवस्था सध्या सुद्धा कोलमडली आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली सुमारे ४० वर्षांपूर्वी असलेली सध्या जीर्ण झालेले ही मोरी आहे. हा मार्ग वर्दळ व रहदारीचा असून सुद्धा संबंधित बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या मार्गावरील देखभाल दुरुस्तीची कामे कासव गतीने चालू आहेत संबंधित ठेकेदार तसेच विभागाचे शाखा अभियंता यांनी याकडे लक्ष देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करून मोरीचे काम योग्य प्रकारे करण्याची मागणी परिसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे. या मोरी वर पडलेल्या भगदाडामध्ये जांभा दगड टाकून बुजविलेले दिसत असून ते दिसू नये म्हणून त्यावर गवत टाकून पडलेला खड्डा लपविण्याचा प्रयत्न केला गेला आहे असा आरोप करत परंतु काही जागरुक ग्रामस्थांनी हे भगदाड हेरले आहे. ते गवत काढल्यानंतर पडलेला खड्डा निदर्शनास येत असून वाहन चालकांना या मार्गावर वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या व्यवस्थेच्या मूळ उद्देशाला यामुळे अडचण निर्माण झाले असून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे अशा प्रकारे तात्पुरती मलमपट्टी करून या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून याची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ उपयोग योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)