ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड भोगलेवाडी येथील श्री. गायगोठण गणपती मंदिरात आज मांगल्याचा माघी गणेश जयंती उत्सव.

चाफेड भोगलेवाडी येथील श्री. गायगोठण गणपती मंदिरात आज मांगल्याचा माघी गणेश जयंती उत्सव.

प्रकाशन: 13 Feb 2024 07:12 PM
वाचन संख्या 152

संतोष साळसकर | शिरगांव : एकमेकांना साह्य करू, अवघे धरू सुपंथ… या उक्तीप्रमाणे माणसातील माणुसकीचे नाते जपत… एकमेकांशी आपुलकीने वागत… एकमेकांची आस्थेने चौकशी करत… वेळप्रसंगी एकमेकांच्या संकटाला धावून जात…एकमेकांशी दुजाभाव न ठेवत… संकटप्रसंगी एकमेकांना मदतीचा हात पुढे करत… समाजाला एकजुटीचा आदर्शवत संदेश देणारे देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील ग्रामस्थ. या वाडीतील ग्रामस्थांची एकजूट खरंच वाखाणण्याजोगी आहे. याच वाडीतील श्री गायगोठण गणपती मंदिरात गेली २० वर्षे माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या दिवशी अंगारक योग आहे.

|| प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ||
|| भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ||

चाफेड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावच्या पूर्वेला ‘दुर्गाचा डोंगर’ हा पुरातनकालीन गड गावाची शान वाढवतो. तर गावची श्री गांगेश्वर-रासाई ही जागृत ग्रामदैवते याच गडाच्या पायथ्याशी घनदाट वनराईत वसलेली आहेत. या गावाला पूर्वी ‘दडगवली’ असेही म्हणायचे.


भोगलेवाडीतील काही ग्रामस्थांना श्री गणेशाने दिलेल्या दृष्टांतानुसार ‘गायगोठण’ या जागृत अशा पवित्र ठिकाणी विघ्नहर्त्या श्री गणेशाची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सन २००४ साली श्री गायगोठण गणपती मंदिर या नावाने करण्यात आली. त्यानंतर वाडीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाने व देणगीदारांच्या सहकार्याने आकर्षक आणि देखणे असे भव्यदिव्य गणेश मंदिर उभारले. लाखो भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी या गणेशाची सर्वत्र ख्याती आहे. दरवर्षी माघी गणेश जयंतीला असंख्य भाविक मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी या लाडक्या बाप्पाला साकडे घालतात आणि ईच्छापूर्ती झाल्यानंतर भक्तिभावाने आपले नवस फेडतात. या उत्सवाला मुंबईहून चाकरमानी, माहेरवाशिणी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवाच्या आठ दिवस अगोदर वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग भक्तिभावाने श्रमदान करत मंदिर व परिसराची साफसफाई करतात. सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. वाडीतील ज्ञानेश्वर राजाराम भोगले यांची आकर्षक पर्णफुले सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेतात.या उत्सवाला वाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी आपापल्यापरीने आर्थिक तसेच वस्तुरुपात देणगी देऊन हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या वाडीतील ग्रामविकास मुंबई मंडळातील तरुण कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने आर्थिक सहकार्य करतात.

या मंदिरात दरवर्षी महाआरती, विविध धार्मिक, सामाजिक, मुलांचे सांस्कृतिक उपक्रम, कोजागिरी पौर्णिमा व इतरही समाजोपयोगी कार्यक्रम पार पडतात. या मंदिराच्या सभामंडपाचे काम याच वाडीतील गावचे सुपुत्र, मुंबई येथील मनसेचे अंधेरी (पश्चिम) उपविभाग अध्यक्ष, राज्याचे मनसे उपाध्यक्ष किशोर विष्णू राणे यांनी स्वखर्चाने केले. याच वाडीतील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख विजय नारायण भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उत्सवाचे नीटनेटके नियोजन आणि सूत्रसंचालन केले जाते. या उत्सवा दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, मंत्रपुष्पांजली, दिवसभर महाप्रसाद व श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, पंचक्रोशीतील सुश्राव्य भजने, रात्री १२ नंतर श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पहाटे काकड आरती आणि दुसर्‍या दिवशी ब्राह्मण भोजनाने या उत्सवाची सांगता होते. या उत्सवाच्या आदल्या दिवशी महिलांचे हळदीकुंकू पार पडते. तरी या उत्सवाला सर्व भाविकांनी श्री बाप्पाचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री गायगोठण गणपती मंडळ देवस्थानचे अध्यक्ष प्रफुल्ल परब, उपाध्यक्ष प्रशांत राणे, खजिनदार सचिन परब, संतोष भोगले यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स