ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माय माऊली..! संकटप्रसंगी भक्तांच्या हाकेला धावणारी….अवघ्या विश्वाची आई.. शिरगांव गांवची श्री देवी पावणादेवी. ( हरिनाम सप्ताह २०२४ )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माय माऊली..! संकटप्रसंगी भक्तांच्या हाकेला धावणारी….अवघ्या विश्वाची आई.. शिरगांव गांवची श्री देवी पावणादेवी. ( हरिनाम सप्ताह २०२४ )

प्रकाशन: 21 Jan 2024 08:09 AM
वाचन संख्या 79

संतोष साळसकर | शिरगांव (सहसंपादक) : कोकणभूमीला निसर्गाने मनमुरादपणे निसर्ग सौंदर्य बहाल केले आहे. पूर्वेला सहयाद्रीच्या उतुंग पर्वतरांगा तर दुसर्‍या बाजूने फेसाळणारा अरबी समुद्र. पर्शुरामाच्या या कोकण भूमीने नेहमीच पर्यटकांचे लक्ष आकर्षून घेतले आहे. अशा या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा जागतिक पर्यटन स्थळ असल्याने दरवर्षी देश विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात. नयनरम्य पर्यटन स्थळांबरोबर गावागावातील पुरातन देवालयांचा परिसर येणार्‍या भाविकांचे मन प्रसन्न करतो. देवगड तालुक्यातील बारा वाडया आणि तेरावा गावठण अशा विस्तारलेल्या शिरगांव येथील जागृत ग्रामदैवत श्री. देवी पावणाई. माहेरवासियांच्या संकटाला धावून जाणारी आणि भक्तांच्या नवसाला पावणारी अशा या विश्वाच्या माऊलीची सर्वत्र ख्याती आहे. या मंदिरामध्ये आज रवि. २१ जाने. रोजी पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी हरिनाम सप्ताह (जत्रोत्सव) साजरा होत आहे.

१८ जानेवारी १९८८ रोजी या मंदिराचा जिर्णोद्धार संत गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुढे १ जून १९९७ साली याच मंदिर परिसरातील श्री देव गोमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. १९ मे २०११ रोजी मंदिराच्या दर्शनी बाजूला ग्रामस्थ मंडळी, बारा-पाच मानकरी, देणगीदार यांच्या सहकार्यातून सुसज्ज असा देखणा आकर्षक सभामंडप बांधण्यात आला.
श्री पावणादेवी देवालयाचा परिसर अंदाजे २३ एकरामध्ये पसरला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. ही देवी साडेतीन गावांची मालकीण असून यामध्ये शिरगांव, शेवरे, ओंबळ व अर्धा वळीवंडे गाव (खराडयापर्यंत) यांचा समावेश आहे. देवालयाच्या गाभार्यात श्री पावणाई देवीसह तिच्या डाव्या बाजूला श्री देव रवळनाथ, श्री देवी विठ्ठलादेवी, श्री काळका देवी, श्री नवलाईदेवी तर उजव्या बाजूला श्री महालक्ष्मी व श्री खजराईदेवी या देवतांची पाषाणे आहेत. या पाषाणांच्या बाजूला बारा आकार व चार चाळयांची रास आहे. श्री पावणाई देवी व श्री देव रवळनाथ या दोघांच्यामध्ये राजसत्ता व पूर्वसत्तेचे प्रतीक आहे. देवालयात पाच तरंग, एक निशाण, एक अबदागीर व बारा पूर्वजांचे प्रतीक आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात साडेतीन गावांचे प्रतीक व भावई देवीचे पाषाण आहे. श्री भावई देवीच्या उत्सवादिवशी हे पाषाण सजविले जाते. माहेरवाशिनी ‘पांढरी’ या नावाने तिचा संकटकाळी धावा करतात. या देवीचा कौलप्रसादाचा व्यवहार डाव्या बाजुने होतो. म्हणून तिला ‘डावरी’ असेही संबोधिले जाते. या देवालयाच्या परिसरात श्री देव गोमेश्वर(आकारी ब्राह्मण) मंदिर आहे. या मंदिराच्या पुढे गेल्यावर घनदाट झाडीत श्री देव कामेश्वर मंदिर आहे. या देवालयात श्री पावणाई देवी माहेरी म्हणून तरंगासह येते. पूर्वी ती महिनोमहिने माहेरी राहायची, आता बारा-पाचांच्या मतांवर तिचा माहेरवास अवलंबून असतो. श्री देव कामेश्वर व श्री देव गोमेश्वर मंदिरात पाच दिवस पावित्र्य पाळूनच जाता येते. मात्र या मंदिरात पिंडीपर्यंत ब्राह्मण किंवा त्या त्या देवातांच्या वसांनाच प्रवेश आहे. येथील देवलयांसमोर तुळशी वृदांवने नाहीत. तर बाराची तुळस व बाराची रास तावडेवाडी येथे आहे. या तुळशीचा विवाह बारा-पाच मानकरी जमून लावतात. त्यानंतरच गावातील सर्व तुळशी विवाह सोहळे पार पडतात.आज ही परंपरा गावाने जोपासली आहे.

८४ खेडयांचा अधिपती साळशी गावची इनामदार श्री देवी पावणाई, जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी या शिरगावंच्या श्री पावणा देवीच्या बहिणी आहेत. तर मालवण तालुक्यातील आचरे गावचे इनामदार श्री देव रामेश्वर हे भाऊ आहेत. साळशी गावची इनामदार श्री पावणाई देवी ही श्रीमंत तर शिरगांवची श्री पावणाई देवी ही गरीब त्यामुळे साळशीच्या आपल्या बहिणीकडे रूसवा करून पश्चिमेला पुढा करून ती उभी आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते.
बाराच्या कुळाच्या नैवेद्याने देवस्थानातील वार्षिकांना सुरुवात होते. दसरा (नवरात्रोत्सव), भावई उत्सव, पोवती पौर्णिमा, देसरूड, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा, होलिकोत्सव, कवळणे आदी उत्सव व वार्षिक बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी मिळून साजरे करतात.
या देवीच्या कृपाशीर्वादामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या देवालयाचा परिसर शासनाच्या पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे देवालयाच्या सौंदर्यांत भर पडली आहे. या हरिनाम सप्ताहाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, सर्व बारा पाच मानकरी, ग्रामस्थ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स