हळवलचा बेपत्ता युवक मृतावस्थेत सापडला ; रेल्वेची धडक बसल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवलच्या माता रमाई आंबेडकर नगर मधील सुशांत प्रकाश कदम हा युवक गेले ४ दिवस बेपत्ता होता. तो खारेपाटण रोड येथे मृतावस्थेत सापडला आहे. खारेपाटण रोड रेल्वेस्थानकापासून जवळच एका युवकाचा मृतदेह आढळला. रेल्वे ट्रॅकमनने याबाबतची माहिती रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह हळवल येथील माता रमाई आंबेडकरनगर येथील सुशांत प्रकाश कदम (३२) याचा असल्याची पुष्टी करण्यात आली.
मयत सुशांत कदम १८ ऑक्टोबरला रात्रीपासून त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याबाबतची माहिती कणकवली पोलिस ठाण्यात त्याचा सख्खा चुलत भाऊ प्रमोद महेश कदम यांनी दिली होती. यापूर्वी सुशांत हा रागाने घरातून अनेक वेळा निघून गेला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या येण्याची काही दिवस वाट बघितली. मात्र, तो घरी न परतल्याने कणकवली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते.
कोकण रेल्वे मार्गावरून जाणाच्या एखाद्या रेल्वेच्या धडकेत सुशांत कदम याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या डोक्याला अनेक जखमा झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खारेपाटण रोड रेल्वे स्थानकापासून जवळच रेल्वे ट्रॅकलगत एका झुडपात काहीतरी कुजल्याचा वास रेल्वे ट्रॅकमनला आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता, एका व्यक्तीचा मृतदेह तिथे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने रेल्वे स्टेशन मास्तर तसेच पोलिस पाटील दिगंबर भालेकर यांना कल्पना दिली. भालेकर यांनी पोलिसांना कळविले. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मृतदेह पाहिला. पोलिसांच्या तपासादरम्यान तो मृतदेह सुशांत कदम याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)