शाळाबंद ; साळशीतील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस..!
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या केंद्र शाळा साळशी येथे सेमी इंग्लिश साठी बीएससी बीएड कायमस्वरुपी शिक्षकाची मागणी पालक व ग्रामस्थांनी २०१६ पासून केली होती. अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने १५ जून सकाळी १० वाजल्यापासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान या उपोषणाला गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच शिष्ट मंडळाला देवगड पंचायत समिती मध्ये चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र ग्रामस्थांना योग्य निर्णय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी आज दुसऱ्यादिवशी ही हे शाळा बंद आंदोलन आणि उपोषण बेमुदत चालूच ठेवले.
देवगड तालुक्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा साळशी नं. १ या प्रशालेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून सेमी इंग्लिश विषय सुरू आहे. त्यामुळे या शाळेत बीएससी बीएड प्राप्त शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी २०१६ पासून होती. याबाबत दोन महिन्यापूर्वी शिक्षण विभागाकडे मागणी ग्रामपंचायत साळशी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केली होती. त्याची पूर्तता न झाल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १५ जून रोजी सकाळी १० वाजता केंद्र शाळा साळशी नं १ येथे ग्रामस्थ, पालक विद्यार्थ्यांसह आंदोलन आणि उपोषण सुरू केले. मात्र संबंधित शैक्षणिक विभागाकडून दरम्यान अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सदरचे आंदोलन व उपोषण दुसऱ्यादिवशी पण चालूच ठेवण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सिंधुदुर्ग यांच्याकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू होणार असल्याने जि प प्राथमिक शाळा साळशी नं १ या प्रशालेला प्राधान्याने बीएससी बीएड शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत कळविण्यात आले होते. माञ उपोषण कर्त्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.
या उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिक्षण विस्तार अधिकारी लवू दहिफळे, केंद्रप्रमुख सौ. वर्षा लाड यांनी भेट दिली. आज दुसऱ्यादिवशी माजी सभापती रवींद्र जोगल, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी देखील भेट दिली. उपोषणाला सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, माजी सरपंच वैभव साळसकर, अनिल पोकळे, विजय सुतार, किशोर साळसकर, विक्रांत नाईक, संतोष साळसकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मिराशी, विशाखा साळसकर, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नाईक महेंद्र महाडिक, कृष्णा जोईल, पाटील सौ. कामिनी नाईक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)