नांदगाव हायवे संदर्भातील विविध विषयांसाठी ठीय्या आंदोलन सुरूच ; सार्वजनिक बांधकाम बरोबरची चर्चा निष्फळ..!
लेखी स्वरूपातील हमी शिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही ; आंदोलनकर्त्यांचा इशारा….!
कणकवली | उमेश परब : कणकवली तालुक्यातील नांदगावातील अजून बॉक्स वेलच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव ओटव फाटा अशा ठिकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच प्रवासी निवारा शेड, दिशा दर्शक फलक, योग्य प्रकारे गटार व्यवस्था नसल्याने हायवेजवळील घराघरात अतिवृष्टीमध्ये पाणी घुसणे आदी विषयांवरून नांदगाव ग्रामस्थांचे आज ठीय्या आंदोलन सुरू झाले आहे. “झालेच पाहीजे झालेच पाहीजे सर्व्हीस रस्ते झालेच पाहीजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्चा खाली करा, हाय हाय सार्व. बांधकाम विभाग हाय हाय, नांदगाव सर्व्हीस रस्त्यांसाठी कोणी वाली आहे का हो वाली” अशा विविध घोषणांनी नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला. तर सार्व. बांध. विभागाने लेखी स्वरूपात हमी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा आंदोलनकर्त्यांनी पवित्रा घेतल्याने आंदोलन सुरूच आहे.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर, मजीद बटवाले, गवस साठविलकर, मंगेश पाटील, वृषाली मोरजकर, रेणूका पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भाई मोरजकर, अब्दुल नावलेकर, बाळा मोरये, करीम बटवाले, इक्बाल बटवाले, लोके तसेच हायवे बाधीत शेतकरी वर्ग आदी उपस्थित आहेत. आंदोलन सुरू असताना खारेपाटण सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता श्री. कुमावत आंदोलकांना सामोरे जात पाऊस पडत होता यामुळे काही कामे थांबली आहेत. ती पुर्वपदावर येतील. तसेच सर्व्हीस रस्ते बाबत भुसंपादन प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा पूर्ण झाल्यानंतर लगेचच सर्व्हीस रस्ते पूर्ण केले जातील. तरी आजचे आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशी विनंती उपस्थित नागरिकांना केली असता वरीष्ठ अधिकारी लेखी स्वरूपात हमी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा आंदोलनकर्त्यांनी पवित्रा घेतल्याने आंदोलन सुरू आहे.
पोलीस निरीक्षक हुंदळेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक के. एस. जाधव तसेच महेते, जांभळे, बावधाने आदी पोलिस कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)