ओणी गांवच्या गोकुळात वात्सल्याच्या सुवर्ण महोत्सवी अक्षता..!
बाॅलिवुड अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी त्यांचा पन्नासाव्वा वाढदिवस ‘वात्सल्य मंदिर गोकुळच्या ‘ अनेक कान्हांसह केला साजरा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील एक सर्वसमावेशक सामाजिक व्यक्तीमत्व, नेतृत्व आणि बाॅलिवुड, मालिका, रंगमंच अभिनेत्री आणि सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. अक्षता कांबळी यांचा पन्नासाव्वा वाढदिवस २४ एप्रिलला एका वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. यादिवशी सौ.अक्षता कांबळी यांनी राजापूर तालुक्यातल्या ओणी येथील ‘वात्सल्य मंदिर गोकुळ संस्था’ या आश्रमात जाऊन त्यांनी तिथल्या छोट्या मुलामुलींसोबत गप्पा, खेळ आणि थोडे बौद्धिक मार्गदर्शन करुन सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाला मातृत्व,वात्सल्य याची एक वेगळी किनार लावली.
खरेतर हा आश्रम निराधार, अनाथ अशा मुला मुलींना आधार देत दिशा दर्शन देणारा आश्रम म्हणून ओळखला जातो. परंतु सौ.अक्षता कांबळींसारखी व्यक्तिमत्व समाजात असताना ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित ऍड. वासुदेव शंकर तुळसकर ज्ञान मंदिर संकुल येथे राष्ट्र दल निवासी शिबीर मध्ये वास्तल्य मंदिर व पंचक्रोशीतील पन्नास ते साठ मुले ही नक्कीच निराधार म्हणता येणार नाहीत आणि या आश्रम संचालकांच्या सेवाभावामुळे ती मुलं अनाथ आहेत म्हणणेही इष्ट ठरणार नाही.
या छोटेखानी वाढदिवस सोहळ्याला वात्सल्य मंदिर गोकुळ मंदिरचे सर्वेसर्वा डॉ. महेंद्र मोहन,देवी काका , कार्यकारिणी सदस्य रुपेश रेडेकर , मनोजकुमार, सुप्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका सरिता पवार , अर्पिता मुंबरकर , अनिल कांबळी आणि आश्रमातील सर्व सेवाभावी हजर होते .
यावेळी अक्षता कांबळी यांनी काही रोख रक्कमही देऊन वात्सल्य मंदिरला मदत केली पण त्यांनी तो आकडा सर्वांपासून गुप्त ठेवलेला आहे. या गोकुळच्या कान्हांसोबत केक कापून त्यांनी बाल आनंद द्विगुणित केला. तिथल्या मुलांनी स्वहस्ते तयार केलेली शुभेच्छा कार्डस् देखील सौ.अक्षता कांबळी यांना भेट दिली. अभिनय व कलाक्षेत्रातील काही मुलभूत गोष्टींचे मार्गदर्शन त्यांनी त्यावेळी केले आणि अभिनय देखील करून मुलांच्या चेहर्यावर आनंद आणला.
सौ.अक्षता कांबळी यांनी या आश्रमात जाऊन सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सार्थकी लागला याचे श्रेय त्यांची मैत्रीण तथा शिक्षिका व कवयित्री सरिता पवार यांना दिले आहे. सौ. अक्षता कांबळी या जितक्या अभिनेत्री, सामाजिक जाणकार म्हणून प्रसिद्ध आहेत तितक्याच त्या मातृत्वाची गोष्ट जगवणार्या एक ‘गजालीकार’ म्हणून देखील सगळे त्यांना जाणतात.
सौ.अक्षता कांबळी यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाची गजाल सामान्य माणसाला एक साधा..सोपा..सरळ संदेश देऊन जाते की ‘आपल्या कडे किती आहे त्यापेक्षा आपण आहे त्यातलं आपण समाजाला किती देतोय’ ते महत्वाचे. मग तो वेळ असो, पैसा असो, कला असो किंवा प्रेम…!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)