सिनेपट
किशोर_कुमार_जन्मदिन (3 ऑगस्ट)
अनिश्चितता असलेल्या बालपणासारखा दुसरा शाप कोणताच नसेल..!
बालपणी पैसा,भौतिक सुखं वगैरेंपेक्षा समाधान,शांती आणि सर्वात प्रिय गोष्ट असते ती म्हणजे वडिलांचे सोबत असणे.
वडिल जर सोबत असतील तर ते सर्वात मजबूत सुरक्षा आणि मजेचं कवच असतं. अगदी दूर नोकरी,व्यवसायाला असलेल्या वडिलांशी फोनवर जरी दोन शब्द बोलता आले तरी तो आनंद खाऊच्या पेटार्यापेक्षाही खूप हवाहवासा असतो.
“दूर गगनकी छाॅव मे..”, ही अशीच एका पितापुत्राची कहाणी.
वडिल शंकर म्हणजे किशोर कुमार सैन्यात असतात. सैन्यात असूनही खूप मृदूपण जपलेला मनाने कच्चाच असलेला एक बाप..!
मुलगा रामू म्हणजे अमित कुमार ( किशोर कुमारांचा वास्तव जीवनातील मुलगा)हा आठवर्षांचा आणि गांवच्या नदीच्या परिसरालाच जीवन मानून जगणारा एक आईवेगळा मूक बाळ!
एकेदिवशी शंकर जेंव्हा गावी येतो तेंव्हा त्याचे घर आगीत जळून भस्मसात झालेले असते. रामूला तर बोलताही येत नसते.
जीवनातले बर्यापैकी सर्वस्व गमावलेला शंकर आता रामूला बोलतं करण्यासाठी काहीतरी करावं या उद्देशाने रामूला घेऊन गांव सोडून शहराकडे निघतो.त्या निघण्यापासून पुढे रामू आणि शंकर कुठे पोहोचतात त्याचीच यात्रा म्हणजे सिनेमा “दूर गगनकी छाॅवमे. …..!”
हा सिनेमा खर्या जीवनातील पितापुत्रांचा एक जबरदस्त कला अविष्कार आहे.मीरा म्हणजे अभिनेत्री सुप्रियादेवी चौधरी हे एक फारसे चर्चा न झालेले एक नांव ह्या सिनेमात आहे.
सुप्रियादेवीने रंगवलेली मीरा ही पहाणे खरंच एक आल्हाददायक आणि एका अस्सल तरुणीचे मन अनुभवणे आहे.
मुसमुसून पित्याच्या मिठीत जाणारा रामू आणि मुलाच्या अख्ख्या पृथ्वीला कवेत घेऊन जपू पाहणारा शंकर पाह्यल्यावर प्रत्येकाला पिता म्हणून खरंच जगावं असंच वाटेल.
खूपदा असं म्हणलं जातं की जगातील प्रत्येक स्त्रीचे सुख हे आई बनण्यात, आईपण जगण्यात असते अगदी तसेच सुख पिता म्हणून जगण्यातही असतेच हे सिद्ध केलेली ही एक कथा.
‘ द प्राऊड रिबेल ‘ ह्या मूळ अमेरिकन सिनेमावर आधारीत ह्या सिनेमाची पटकथा ,संवाद,संगित,दिग्दर्शन व शंकरचा अभिनय सबकुछ स्वतः किशोर कुमार यांनी केलंय.
जीवनात एकदा हा शंकरचा जीवनातील सूर जरुर पहावा कदाचित एखाद्या मनुष्यजीवातील बापापणाचे सप्तसूर हरवले असतील तर ते पुन्हा गवसतील. …..आणि ज्यांना पितापण माहितच नसेल त्यांना एक पितृ आचरणाचे विद्यालयच गवसेल….!
गेल्या तीन पिढ्या आणि सध्याची पिढीही किशोर कुमारच्या कर्जातून उतराई होऊ शकत नाही ….म्हणजे आपल्याला किती भरभरुन दिलं असेल ना किशोर कुमार नामक कलेच्या ह्या निर्व्याज सावकारानं! आपली सिंधुनगरी चॅनेल
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)