तिचे वाण तिचा हक्क ; इळये गांवात विधवा महिलांचा 'खणानारळाच्या ओटीसकट' हळद कुंकवाने झाला सन्मान. ( सामाजिक परिपक्वता विशेष )
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या इळये गावात विधवा प्रथा निर्मुलन अंतर्गत हळदीकुंकू कार्यक्रमात विधवा महिलांचा हळदकुंकू लावून व ओटी भरुन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी महिला ग्रामसंघ इळये यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.
हळदीकुंकू म्हणजे सुवासिनींचे लेणं असे समजणा-या समाजामध्ये विधवा महिलांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले. विधवा प्रथाबंदी कायदा आलेल्या असतानाही जुन्या परंपरा, रूढी, चालीरिती यांत अडकलेल्या समाजाचा थोडाफार शाब्दिक व मानसिक त्रास होणार हे माहित असूनही महिलांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटणारे इळये गांवचे सरपंच श्री.जयदेव भास्कर कदम यांच्या पाठींब्या मुळेच सखी महिला संघ इळये यांनी चार पाऊले पुढे जाऊन विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून वाण देऊन न थांबता त्या विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरून त्यांचा यथोच्चित सत्कार केला. यामध्ये इळये येथील चार विधवा महिला उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)