मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी जत्रोत्सवाची ‘लळीताने’ सांगता.
कडाक्याची थंडिही रोखू शकली नाही भाविकांची ‘अलोट’ गर्दी आणि भक्ती…!
मसुरे | प्रतिनिधी : सध्याच्या शीत लहरीमुळे वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता भाविकांनी केलेली गर्दी, पालखीच्या वेळी “हर हर महादेव” असा झालेला जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात हजारो भाविकांच्या साक्षीने पालखी प्रदक्षीणा पुर्ण झाल्या नंतर देवगड तालुक्यातील मुणगे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी जत्रोत्सवाची सांगता मंगळवारी उत्तर रात्री लळीताच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमा वेळी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. लळीताच्या कार्यक्रमा नंतर भाविकांचे नवस पेटत्या मशालीसमोर फेडण्याचा कार्यक्रम झाला.
६ जानेवारी रोजी जत्रोत्सवास प्रारंभ झाल्या नंतर देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. पाच दिवस चाललेल्या जत्रोत्सवा मध्ये दररोज गोंधळी नृत्य, भजन, पालखी, किर्तन आदि कार्यक्रम झाले. गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व नेत्रदिपक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. मालवणी खाजा खरेदी करण्यासाठी मिठाई व्यावसाईकांच्या दुकानावर गर्दी झाली होती. बच्चे कंपनी खेळणी घेण्यासाठी आग्रही होती. यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावात दाखल झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरानी जत्रोत्सवास भेट देऊन देवीचे आशिर्वाद घेतले. यावर्षी जत्रेचा परिसर वाढला होता. मोठ्या प्रमाणावर व्यापार्यानी आपली दुकाने थाटल्याने देवालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
भाविकांना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान कमीटीच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले होते. एसटी विभागाकडून यात्रा स्पेशल गाड्या मुळे भाविकांची चांगली सोय झाली. पाच दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रोत्सव यशस्वीपणे संपन्न झाल्याने श्री भगवती देवस्थान कमीटीच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाध्ये,उपाध्यक्ष- दिलीप दिगंबर महाजन,सचिव- निशाद परूळेकर,
सदस्य प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, वसंत शेट्ये, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर यानी सर्वांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)