मुलांमध्ये एकजूट व सांघिक भावना रुजविण्याची आवश्यकता - कॉ. शैलेंद्र लिमये.
एस.बी.एच .स्टाफ असोसिएशन च्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
एस .बी .एच.स्टाफ असोसिएशन या बँक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय संघटनेने संघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये तसेच खेड्यापाड्यात सार्वजनिक उपक्रमांद्वारे आपली सामाजिक बांधिलकी जपली. ह्या अंतर्गत मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खेळांचे साहित्य देण्याबरोबरच मुलांमधील इतर कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने कासार्डे जांभूळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या.
संघटनेचे अध्यक्ष कॉ. शैलेंद्र लिमये यांनी आपल्या संदेशात मुलांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात एकता आणि संघ भावनेचे महत्व विषद केले. अलीकडच्या काळात मुलांमध्ये मैदानी खेळांची कमी झालेली आवड तसेच क्रिकेट, कब्बड्डी सारख्या टी. व्ही. वर दिसणाऱ्या खेळांपुरतीच उत्त्पन्न झालेली रुची ह्या बद्दल चिंता व्यक्त करताना कॉम. लिमये यांनी शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन यांना लंगडी, खो खो, धावण्याच्या शर्यती, आणि तत्सम पारंपरिक स्पर्धांची माहिती व आवड मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कासार्डे हायस्कूल पालक प्रतिनिधीचे उपाध्यक्ष अतुल सावंत यांनी आपले विचार मांडताना एस. बी. एच. स्टाफ असोसिएशनने वेळोवेळी जपलेल्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. विशेषतः चिपळूण मधील पूरग्रस्तांना केलेली मदत, नागसावंतवाडी शाळेतील स्वच्छतागृहांचे बांधकाम अशा मदतीमधून या असोसिएशनने आपली सामाजिकता जोपासली असल्याचे प्रतिपादन केले.
एस बी एच स्टाफ असोसिएशनच्या वर्धापन दिन मुलांच्या हस्ते साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडेरेशनचे उपाध्यक्ष कॉम. बी. एस. सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत, सचिन वंजारे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)