मसुरे येथे पारंपरिक पद्धतीने गवळदेव उत्सव संपन्न..!
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे मर्डेवाडी येथील डोंगरावर गवळदेव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोकणात आजही पारंपरिक प्रथा अगदी जाणीवपूर्वक जपल्या जात आहेत. गवळदेव ही त्यापैकीच एक मोठ्या अपूर्वाईने जपलेली प्रथा. आपल्या पाळीव जनावरांना जिवापलीकडे जपणाऱ्या व गोवंशाची काळजी घेणाऱ्या अशा निसर्ग देवतेप्रति श्रद्धेच्या भावनेने हा उत्सव साजरा केला जातो.
कोकणात भातकापणीची कामे चालू झाली की, या गवळदेवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तुळशी विवाह समारंभ पार पडला की, शनिवार किंवा रविवार असा एक दिवस ठरविला जातो व वाडीतल्या बाळगोपाळांना एकत्र जमवून रानातील गवळदेवाची पूजा-अर्चा केली जाते, सामूहिक भोजन (वनभोजन) केले जाते. हाच गवळदेव कार्यक्रम.
गवळदेवाच्या ठिकाणी सर्वजण जमून चुलीवर भात, भोपळ्याची भाजी, डाळ, वडे आदी पदार्थ शिजविले जातात. गवळदेवाची पूजाअर्चा करून, एकत्र बसून भोजन केले जाते.
वाघोबाची शांतीया जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी केली जाते. जंगलातील वाघाला शांत करण्यासाठी त्याच्या नावाने एक वाडी (नैवेद्य) काढून ठेवण्याची प्रथा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एखाद्या युवकाला वाघ बनवून (चेहरा वाघासारखा) त्याला प्रसाद खाण्यास दिला जातो. व त्या नंतर तोंडात वडा पकडून या प्रतिकात्मक वाघाला पळविले जाते. व त्या नंतर सर्व ग्रामस्थ एकत्र महाप्रसाद घेतात. गवळदेव कार्यक्रम निमित्त ग्रामस्थ सुद्धा एकत्र येत वनभोजनाचा आनंद घेताना दिसून येतात. मर्डे डोंगरावर कार्यक्रमासाठी जेष्ठांसह युवकांची उपस्थिती मोठी होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)