पर्यटन राजधानी मालवणात तब्बल ७४८ पक्षांची वस्ती…!
स्थानिक पक्षांसह युरोपियन निलपंखची सुद्धा झाली नोंद..!
रानमित्र टुरिझम आचराचे आयोजन.
चिंदर | विवेक परब : पक्षीसप्ताहाचे औचित्य साधून रानमित्र टुरिझम आचरा तर्फे आयोजित करण्यात आलेला, मालवण शहरातील पक्षीगणनेचा कार्यक्रम, शनिवार दिनांक ५ नोव्हेंबरला उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत मालवण मधील सागरी महामार्ग परिसर ( आचरा रोड ), आडवण परिसर आणि गणेश मंदिर ते रॉक गार्डन या परिसरात पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत एकूण 98 प्रजातींच्या 748 पक्षांची नोंद करण्यात आली.
लहान शिंजिर, छोटा गोमेट, चिमणी, मैना, टोई पोपट, ठिपकेवाली नाचण, बलाकचोच खंड्या, हिरवी ढोकरी, स्वर्गीय नर्तक या स्थानिक प्रजातीसोबतच तपकिरी डोक्याचा कुरव, पल्लासचा कुरव, छोटा कंठेरी चिखल्या, सामान्य तुतारी, सामान्य गप्पीदास आणि युरोपियन निलपंख यांसारखे स्थलांतरित पक्षीही आढळून आले.
या पक्षीगणनेसाठी रानमित्र टुरिझम आचराचे शिल्पन गावकर, डॉ. श्रीकृष्ण मगदूम, स्वप्नील गोसावी, ऍलिस्टर फर्नांडिस, सुशांत सावंत, सिद्धेश देवधर आणि तेजस सामंत उपस्थित होते. त्या बरोबरच मालवण वायरी येथील दर्शन वेंगुर्लेकर आणि खानविलकर तर मालवण येथील चंद्रवदन कुडाळकर व स्वाती पारकर उपस्थित होते.
याप्रसंगी कोल्हापूर येथील श्री व सौ. मिलिंद गडकरी हे पक्षीप्रेमीही उपस्थित राहिले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)