वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा दणका..!
१० रुपये फसवणूक केल्याप्रकरनी वीज कंपनीने तक्रारदाराला १५,०००रुपये देण्याचा जिल्हा ग्राहक मंचाचा आदेश.
ओरोस | ब्युरो न्यूज : वीज वितरण कंपनीने विद्युत बिलाच्या रकमेवर १० रुपये जास्त आकारले. ही फसवणूक वीज कंपनी सर्वच ग्राहकांची करीत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाच्या न्यायालयासमोर सिंधुनगरी येथील दळवी यांनी दावा दाखल केला होता. या न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत विद्युत ग्राहकांच्या या मोठ्या फसवणुकीबाबत दहा रुपयांची जादा आकारणी केली म्हणून श्री विष्णुप्रसाद विठ्ठल दळवी यांना मन:स्ताप दिल्याबद्दल १०,००० रुपये व दाव्याच्या खर्चापोटी ५००० रुपये ४५ दिवसांच्या आत अदा करण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांकडून फसवणूक करून करोडो रुपये उकळणार्या वीज कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे .
दिलेल्या मुदती पूर्वी वीज देयकाचे पैसे भरले तर दहा रुपये सवलत त्या मुदतीनंतर पैसे भरल्यास दहा रुपये जादा या सवलतीमध्ये सर्वच विद्युत ग्राहकांची फसवणूक होत असते. आपल्या बिलाचे दहा रुपये जास्त घेतले तसेच अन्य ग्राहकांचेही वीज कंपनी दहा रुपये जास्त घेते ही बाब सिंधुनगरी ओरोस सुलोचना नगर येथील श्री. विष्णुप्रसाद विठ्ठल दळवी ६५ वर्षीय नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. विज कंपनी आपले दहा रुपये जास्त घेते मात्र ते सर्वच वीज ग्राहकांचे दहा रु जास्त घेऊन ग्राहकांची फसवणूक करते व लाखो ग्राहकांकडून करोडो रुपये उकळले ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट आपल्या दहा रुपयांच्या नुकसानीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला. ग्राहक मंचाने हे ही बाब गांभीर्याने घेत या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता व विभागीय कार्यकारी अभियंता यांना पक्षकार करत त्यांच्याविरूद्ध ही तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार विष्णुप्रसाद दळवी यांचे ओरोस सुलोचना नगर येथील राहत्या घरातील डिसेंबर २०१९ विद्युत बिल ५४० रु आले होते. वीज कंपनीने हे बिल १८/१२/२०१९ पूर्वी भरल्यास १० रूपयांची सवलत देत ५३० व वरील तारखेनंतर अदा केल्यास ५४० रु असे बिलात नमूद केले होते. मात्र प्रत्यक्षात संगणक प्रणालीवर ५४० रुपयांचे बिल दिसत होते. अशा सर्वच ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी संगणक प्रणालीवर दिसणारे बिल भरून ग्राहक मंचाकडे या फसवणुकीबाबत दावा दाखल केला होता. व ग्राहक मंचाच्या न्यायालयासमोर सर्वच ग्राहकांचा या फसवणुकीबाबत स्वतः युक्तिवाद केला होता. ग्राहक मंचाने त्यांची बाजू ऐकून घेत वीज वितरण कंपनीला चांगलीच चपराक दिली आहे. त्यांच्या मानसिक त्रासापोटी दहा हजार व दाव्याच्या खर्चापोटी पाच हजार रक्कम पंचेचाळीस दिवसांच्या आत द्यावी असा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)