रामगडावर विजयदुर्गोत्सव संपन्न ; दुर्गवीर प्रतिष्ठानची संकल्पना .
श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड येथे विजयादशमीचे औचित्य साधून दुर्गवीर प्रतिष्ठानने ‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ या संकल्पनेतून विजयदुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी गडावर गडपूजन, गणेश पूजन, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अनोळखी व दुर्गम गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. दसर्या दिवशी, रामगड किल्ल्यावर, दुर्गवीरांनी सकाळी लवकर येऊन गडावर पूर्व तयारीला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दुर्गवीरांसोबत गडावरील पूर्वतयारीला सहकार्य केले. यावेळी फुलांच्या माळा, पारंपरिक नव्याची तोरण , पताका यांच्या साहाय्याने गडाची प्रवेशद्वारं सजविण्यात आली. गडांच्या दोन्ही द्वारांवर गडपूजन करून पुढे ग्रामस्थांच्या हस्ते गडावर असलेल्या प्राचीन गणेश मूर्तीचे ,तुळशी वृंदावनाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती आणि गारद देऊन पुढील कार्यक्रम अर्थात शस्त्र पूजन करण्यासाठी सर्वजण गडावर असलेल्या तोफांजवळ पोचले. वर्षभर गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी तयार असणा-या तसेच ज्याच्यामुळे गडसंवर्धनाचे काम दुर्गवीर करू शकतात त्या अवजारे आणि हत्यारांचे विजयादशमी निमित्त पूजन व औक्षण करण्यात आले. शेवटी प्रसाद वाटप करून महाराजांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी रामगड सरपंच श्री. विलास घाडीगांवकर, भालचंद्र पवार, अमिताज तारकर, दीपक कामतेकर, नरेश कामतेकर, शुभम मठकर, तुषार साळसकर यांसह अनेक स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
या उत्सवासाठी मिलिंद चव्हाण, संकेत परब, चैतन्य आरेकर,राज मालोंडकर, चेतन घोणे,तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, गणेश मालंडकर, प्रथमेश वरवडेकर,ओंकार पालव, प्रणय चव्हाण, मंदार शेट्ये, सहना प्रभुदेसाई, सायली आचरेकर, वैभव वाघाटे, धनंजय सावंत, विनायक गुरव, मिलिंद नाईक, तुषार नार्वेकर, रोहीत कडू, कपिल मेस्त्री, केतन मेस्त्री या दुर्गवीरांनी योगदान दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)