ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जोगवा आईचा…! ( विशेष )
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जोगवा आईचा…! ( विशेष )

प्रकाशन: 30 Sep 2022 11:58 AM
वाचन संख्या 398

“चल उठ लवकर.तुला न्हायला घालते.खणाचं परकर पोलकं घाल, गळ्यात हिरव्या मण्यांची दूड घाल.” आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला जागं केलं.
” ऊं… झोपू दे ना गं.काय आहे आज ?” मी पेंगुळल्या आवाजात विचारलं,
” आज नवरात्रातला मंगळवार.आपल्या घरातल्या कुवारणीनं पाच घरी ‘जोगवा’ मागायचा असतो.तू आता नऊ वर्षांची झालीयस ना , तुझा मान आहे तो बरं का !” आईनं अंथरूणाच्या घड्या घालत सांगितलं.
तेव्हापासून मी वयात येईपर्यंत दर नवरात्रीतल्या मंगळवार, शुक्रवारी मी जोगवा मागितला आहे.तो का मागायचा असतो हा प्रश्न माझ्या मनात तेव्हा कधीही उद्भवला नव्हता. आई सांगते म्हणून आणि हा मान असतो असं तिनं सांगितल्यामुळे तर माझी ऐटच वाढलेली.भावाला टुक टुक करून मी हातात जोगव्याचं सुपलं घेई.
त्या लहान्या सुपल्यात आईच आधी घरचा जोगवा घाली.मूठभर तांदूळ आणि पाच पैशांचं नाणं.

Article image


मी मग आमच्या चाळीतल्या ठरलेल्या पाच घरी जाऊन
” अंबाबाईचा जोssगवाss”असं मोठ्याने म्हणे.
सुरूवातीला मला केवढं कानकोंडं व्हायला झालं होतं! “ईss हे काय असं दुस-याच्या दारात जाऊन भिक्षा मागायची ? काय म्हणतील लोकं? त्यातलं एक घर तर आमच्या वर्गातल्या अरूण गद्रेचं.त्याला वर्गात मला चिडवायला आयतंच कारण मिळेल.” मी फुरंगटुन आईला म्हटलं होतं.
” काही नाही चिडवणार.कुळाचार आहे आपला तो.गद्रेवहिनींना माहीत आहे सगळं.जा तू.आणि देवाच्या कामाला लाजू नये.उजळ माथ्यानं करावं.” आईनं माझी समजूत घातली होती.
मग हिरव्या परकर पोलक्यातली, हिरवी दूड गळ्यात घातलेली, न्हाल्या केसांची बटवेणी घातलेली परांजप्यांची कुवारीण जोगवा मागायला निघे.
इनामदार आत्याबाई, पवारवहिनी, धुळपआजी, गद्रेकाकू आणि खटावकरमावशी अशा पाच घरी मी बाहेरून जोगवा मागितला की, त्या घरी माझं उत्साहाने स्वागत होई.मला हळदीकुंकू लावून केसात एखादं फूल नाहीतर गजरा माळला जाई.सुपल्यात तांदूळ आणि त्या घराच्या परिस्थितीनुसार पाच, दहा पैसे, चार आणे, आठ आणे मिळत.

Article image


घरी आले की आई माझी अलाबला घेई.कशी साजरी दिसते माझी कुवारीण असं म्हणे.
जोगव्यात मिळालेल्या तांदळातले मूठभर दाणे घरातल्या तांदळात मिसळले जात प्रसाद म्हणून.आणि बाकीचे तांदूळ, पैसे मात्र आई देवीच्या मंदिराबाहेरच्या भिक्षेक-यांना देऊन येई.

वयात येऊस्तो मी जोगवा मागितला आहे.नंतर ते रिवाजाप्रमाणे बंदच झालं.
पण —
मोठेपणी अनेकदा ग्रामीण भागातल्या विनाअनुदानीत शाळांमध्ये काम करताना दशक्रोशीत हिंडून देणग्या मागितल्या आहेत,
साहित्यिक वा सामाजिक कार्यक्रमांसाठी दारोदार जाऊन निधी गोळा केला आहे,
गरीब रूग्णांसाठी अर्थसहाय्याची आवाहनं केली आहेत,
दर्जेदार मासिके, पाक्षिकांसाठी वर्गणीदार मिळवले आहेत.

Article image

जोगवा मागताना आपण तो देवकार्यासाठी मागतो आहोत याचं भान जागं असणं
‘मागतो’ आहोत– देण्या न देण्याचा निर्णय समोरच्याचा आहे हे मान्य असणं
त्यानं न दिलं म्हणून तो कायमचा काळ्या यादीत न टाकणं
मागतानाचा आपला स्वर विनम्र असणं, याचक म्हणून आलो आहोत याची जाणीव असणं
‘ मी’पणा दाराबाहेर ठेवून प्रवेश करणं
आणि ज्या कामासाठी जोगवा मागत आहोत त्यातला हेतू स्वच्छ पारदर्शी असल्याने कणभरही संकोच वा भीड न बाळगणं…
ही मूल्य माझ्या मनात रूजवणा-या माझ्या आईनं किती सुपल्याभरून विचारधन मला दिलं याची आठवण दर नवरात्रीत येते.कारण’मागण्याच्या’ या सवयीने समाजऋणाला जागण्याचं समाधान मिळालं आहे.आपली तेवढी ऐपत नसूनही गरजूंना मदत करता येते याची प्रचिती घेतली आहे.या हातानं मागायचं आणि त्या हातानं देऊन मोकळं होतानाचं श्रीमंत अध्यात्म अनुभवलं आहे.

Article image


ही श्रीमंती मिळण्याचे संस्कार मला कुवारपणात माझ्या आईने मला सुपूर्द केले आहेत.हे ‘मागणं ‘ कुळाचार म्हणून माझ्याकडून करवून घेत तिनं माझ्यातला नागरिक घडवला आहे.
हा कुळाचार कोणी आणि कशासाठी सुरू केला असेल हे आमच्या घराण्यात कोणालाही माहीत नाही.मी माझ्यापरीने अर्थ लावत गेले आहे.ज्या कोणी हे सुरू केलं आणि त्याला ‘कुळाचार’ अशी संज्ञा दिली त्या माझ्या पूर्वजांच्या मनात हाच हेतू असेल का ? असावा कदाचित.कारण गरीब श्रीमंत अशी वर्गवारी आणि जातीची उतरंड असणा-या समाजात ‘ मागण्या’ मागची भावना त्या भूमिकेत जाऊन समजून घेणं, स्वतः त्या याचक पातळीवर उतरणं ही गरज द्रष्टेपणाने ओळखली असावी.म्हणूनच जोगवा मागताना अमुक एका जातीच्या घरीच गेलं पाहिजे हा दंडक नव्हता…की मुंबईच्या मिश्र वस्तीत आईला तो पाळता आला नव्हता ? माहीत नाही,पण तो दंडक असेलच तर शिथील करून आईने तो कुळाचार माझ्याकडून करवून घेतला होता.एका संस्काराचं रूजवण माझ्या मनात झालं होतं.

या संस्कारांमुळेच कुठल्याही याचकांबद्दल तुच्छतेची भावना मनात निर्माण झाली नाही.अगदी रस्त्यावरच्या, मंदिराबाहेरच्या किंवा सिग्नलवरच्या मागणा-या लोकांबद्दलही हेटाळणीची भावना उद्भवली नाही.द्यायला जमलं नाही काही वेळा तर हाडतुड तरी केली जात नाही.
त्या अनाथनाथा अंबाबाईने माझ्या जन्मदात्या आईकडून मला हा आयुष्यभर पुरेल इतका जोगवा घातला आहे.
उदे गंsss आई sss उदे उदे !

Article image

लेखिका : सौ. वैशाली पंडित, मालवण. ( क्रिएटीव्ह हेड , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स