ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भराडी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भराडी.

प्रकाशन: 04 Feb 2023 06:46 AM
वाचन संख्या 256

आंगणेवाडी जत्रा, या विषयावर लिहीणं म्हणजे पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या आठवणींचा एक विलक्षण खेळ.. जत्रेतल्या त्या पाळण्यासारखा उंचच उच आभाळाला भिडणारा. रिंगाच्या खेळात अडकलेल्या वस्तुसारखं मन आठवणीच्या रिंगात अडकून पडते. मागे कुणीही नसताना कुणीतरी त्या गर्दीत तुम्हाला ओढत राहते आणि याच भक्ती आणि अनाम शक्तीच्या आवेगाचं नाव असतं, आंगणेवाडी जत्रा…

आंगणेवाडी.. लौकीक दृष्ट्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक छोटेखानी गावं. महाराष्ट्राची दक्षिण काशी अशी आम्ही कोकणवासीयानी सर्वदूर पसरवलेलं शक्तीपीठ. आंगणेवाडीची यात्रा ही खरतर फक्त आंगणे कुटुंबियाची असते, पण या देवीवर महाराष्ट्रासह देशभरातल्या कोट्यवधी भक्तांचा विश्वास बसलाय कि आता हेच आमचं कुलदैवत !

आंगणेवाडीची यात्रा प्रत्येकाच्या आठवणीत असते. आणि त्याच व्याजावर वर्षभर जगण्याचा सोस कमी करायचा आणि पुन्हा नव्यानं नव्या जत्रेच्या आठवणीचं मुद्दल काळजाच्या बॅंकेत जमा करायचं अशी ही दसादशे नफ्याची यात्रा असते.. आपल्या आईबापाच्या हाताला पकडून जाणा-या चिमुरड्याला पाळण्यात बसायचा मोह असायचा, आज तेच पोरगं बाप झाल्यावर त्याच्या चिमुरड्या लेकरासाठी, पाळणे, मौत का कुवा, गोल गोल गाडी, टॉय ट्रेन म्हणजे एम्युझमेंट पार्क व्हीझीट होऊन जातेय.. दरवर्षी गर्दी वाढत जातेय..

या प्रत्येकाला देवीची जत्रा तुम्ही स्वताहून इतरांना कळवा असं कुणी कुणालाच सांगत नसायचा.पण प्रत्येकजण करायचा कारण प्रत्येकाची जत्रा प्रत्येक भाविकांपर्यत पोहचली पाहीजे अशी मनपुर्वक श्रद्धा असायची. आणि याच श्रद्धेतून गावातल्या पोस्ट ऑफिसातून म्हाता-या आवशीचो मुंबयच्या चाळीत तलाच्या बाजुला नलाच्या खोलीच्या आंगाला रवना-या झिलाक फोन जायचा, मुलाचा रिप्लाय असायचा की नेमक्या त्याच तारखेला काहीतरी ऑफीसचं काम असायचं तो यंदा येऊ शकणार नाही. खर तर त्या माऊलीला त्या नकाराची अपेक्षाच नसायची. पुढं तो पोरगा बोलायचा आवशी तूच जा आनी देवीक माजो नमस्कार सांग. त्याचवेळी एवढा वेळ शांत असणारी ती माऊली ती ओरडायची, चुलीत गेली नोकरी, शिग्रेट फॅक्टरीजवळ सामान घेवन यायचा आनी रातरानीन गप्प सुनेक आनी नातवाक घेवन गावाक ये.. नोकरी गेली तरी चल्लात दुसरी गावात.. अरे तू जत्रेक ये , छप्पन नोकरीचे कॉल येतले.. माझी देवी खमकी हा..

हा सगळा प्रसंग कित्येक चाकरमान्यांच्या आय़ुष्यात शब्दश: घडला असेल.. भरपगाराची नोकरी एका जत्रेसाठी बिनदिक्कत सोडून देण्याची भाषा करणारी माऊली सिंधुदुर्गाच्या खेड्यापाड्यात आज वेगवेगळ्या नावानी चाकरमान्याची आये म्हणून मिरवतत… हा सगळा श्रद्धेचा आणि अनाम उर्जेचा स्त्रोत आहे.. जत्रा सुरु होऊन कित्येक वर्ष झाली असतील पण आजही त्याच उत्साहानं आणि तेवढ्याच भक्ती कल्लोळात आंगणेवाडीचीही जत्रा लक्षावधी भाविकांना एकाच दिवशी भेटावयास बोलवते.

भाविकांच्या प्रेमानं मंदिराचं रुपडं बदलतय. आज अनेक जण विचारतात देवीचा फोटो का काढत नाही. याच उत्तर प्रथा परंपरेत असेल पण माझी वैयक्तित श्रद्धा आहे कि या देवळात येऊन तुम्ही भराडीदेवीचा चेहरा एकदा पाहिला ना कि तो तुमच्या काळजातल्या गाभा-यात घट्ट प्रतिस्थापीत होतो. आणि ज्या काळजात देवी वसते ना त्या दैवताचे फोटो, चित्रिकरण अशा गोष्टींसाठी मन आसूसलेलं नसतच मुळी.. आणि म्हणून मिटल्या डोळ्यासमोर आईचे या मातीतली रुप लोकदैवत म्हणून उभं राहते आणि भवानी अष्टकाच्याच ओळी तुम्हाला संजीवन बनवतात…’गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भराडी.’

(लेखन – ऋषी देसाई, वृत्तनिवेदक, मालवण, ९८७०९०४१२९)

(फोटो सौजन्य : सिद्धेश चव्हाण , मालवण)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स