शिक्षक भारती कडून काळ्या फिती लावून आंदोलन..!
वर्गात फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
‘आपले गुरुजी’ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या उपक्रमाला आता शिक्षक संघटनांनी विरोध केला असून शिक्षक भारतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिक्षण विभागाने वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन आठवड्यांत याबाबत पूर्तता करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक स्तरावर देण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी यासंदर्भातील कार्यवाही करावी.
आणि तो अहवाल कार्यालयात सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षक भारतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार
शिक्षण आयुक्त पुणे यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना व्हीसीद्वारे ए फोर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत.
शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. २९ ऑगस्टला काळ्या फिती लावून काम करण्यात आले व शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दिपक केसरकर याना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे,जिल्हा संघटक लहू पाटील, विकास कपाटे मालवण कोषाध्यक्ष विनेश जाधव, रोहित भगत, तुकाराम खिल्लारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)