काळशात दुहेरी अपघात...! (ब्रेकिंग)
कुडाळ चौके मार्गावरील अपघाताचे भयसत्र सुरुच..!
चौके | अमोल गोसावी :
चौके धामापूर कुडाळ मार्गावर गेले काही दिवस अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवार दिनांक २७ जुलैला सकाळी ८ वाजता चौकेच्या दिशेने जाणाऱ्या GA 09 – V – 9123 या भरधाव डंपरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअर च्या समोरील रस्त्याकडेच्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. त्याचवेळी या डंपरच्या मागाहून येणाऱ्या GA 09 – U – 5123 या डंपरचेही वेगावर नियंत्रण न राहिल्याने तो डंपर पोलला धडकलेल्या डंपरला मागून आपटला आणि याठिकाणी दुहेरी अपघात घडला.
सदर अपघातात विद्युत पोलचे चार तुकडे झाले आणि वीजवाहिन्या तुटून वीज वितरणचे नुकसान झाले आहे. तर दोन्ही डंपरच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले आहे. परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
वीज वितरण कर्मचारी आणि ठेकेदार यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले
दरम्यान चौके धामापूर कुडाळ मार्गावर कुठेही गतीरोधक नसल्यामुळे आणि भरधाव वाहनांच्या खास करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या तसेच इतर वाहनांच्या वेगावर वाहतूक विभागाचे नियंत्रण नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातामुळे कोणाचातरी बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासन जागे होणार का असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)