<em>येवा सिंधुदुर्ग सुरक्षित(च) आसा..!!</em>
संपादकिय । देवेंद्र गावडे
बुधवार । १ जून, २०२२
असं म्हटलं जातं कि..उकळत्या पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करू नये, कारण उकळत्या पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसू शकत नाही.
गेल्या काही दिवसांपासून ‘सिंधुदुर्ग पर्यटन’ या विषयावरून जी राळ उठली, त्यावेळची स्थिती पाहता शांत रहाणं योग्य होतं..कारण त्या धुरळ्यात प्रत्यक्ष जी वस्तूस्थिती आहे ती पार झाकली गेली होती.
अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यापैकि एखादी अप्रिय घटना घडते आणि ही अप्रिय घटना म्हणजेच आपल्या दृष्टीने ‘दुर्घटना’.
अशा अप्रिय घटना वारंवार घडत असतील तर ती चिंताजनक परिस्थिती. पण मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी अप्रिय घटना घडली..तर त्यावेळची काही तात्कालिक कारणे तपासली जायला हवीत. ना कि संपूर्ण ‘परिस्थितीच बिघडलेली’ आहे असं चित्र उभं करायला हवं.
मान्य कि कुणाच्या जिवावर एखादी गोष्ट बेतणं..हे स्विकारार्ह नाही. पण ते तसं घडलं त्याला केवळ एकच बाजू जबाबदार होती का..कि अन्य काही अनपेक्षितपणे वातावरणामध्ये घडून आलेले बदल कारणीभूत होते वगैरे तपासाचा भाग.
गुलाबाचं फुल आवडतं म्हणून त्याच्या पाकळ्या गोंजारणं हि रसिकता पण त्याच्या देठाला काटे असतात हे विसरून ते करकचून मुठीत आवळून धरणं हा आपला निष्काळजीपणा.
चंदनाच्या बनाचं आकर्षण असणं..मानवी मनाला भुरळ घालणं हे क्रमप्राप्त..पण त्याच बनात विषारी सापांच वास्तव्य असतं हे माहिती नसणं जीवावर बेतू शकतं.
पर्यटन स्थळांना भेट देताना..तीथे उपलब्ध असणा-या खेळांना ‘साहसी खेळ’ असं म्हटलं जातं. ते खेळ ‘साहसी’ या गटात येतात. त्यामूळे त्यात सहभागी होताना आपण आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन त्यात सहभागी होणं..आणि त्यासाठी आवश्यक ती माहिती..त्याची जाणिव देखील आपल्याला असणं..आपणं एक ‘पर्यटक’ म्हणून आवश्यकचं.
कुडाळ एम्.आय्.डी.सी.च्या सुरूवातीच्या काळात तीथल्या कारखान्यात एक परप्रांतीय रहायला होता. जेवण बनवण्यासाठी असलेला हा आचारी त्याला सगळेजण ‘महाराजा’ म्हणत.
काजूगर थेट चकचकीत पॅकेटमधून डीशमध्ये..आणि डीशमधून तोंडात एवढाच त्या ‘काजूगरांचा प्रवास’ पाहिलेल्या त्या परप्रांतीय आचा-याने जेंव्हा झाडावर लटकलेले ‘हीरवेगार काजू’ (फका) पाहीले..तेव्हा तो एकदम वेडापिसाच झाला.
अधाशासारखे त्याने ते काढले..आणि कच्ची कैरी दाताने चावून तोडून खावी तसे टराटर चावले..पूढे जी काय त्याची तोंडाची अवस्था झाली असेल..हे अस्सल मालवणी माणसाला सांगायला नकोचं.
आता त्याच्या त्या सडलेल्या तोंडाच्या अवस्थेला..काजूचं झाड जबाबदार..कि काजूच्या झाडाचा मालक जबाबदार..का त्याचा आतातायीपणा..त्याचं अज्ञान जबाबदार..हे ज्याचं त्याने ठरवावं.
‘सिंधुदुर्गा’ने पर्यटनाच्या बाबतीत ‘गोव्या’ला..स्वच्छता..सुरक्षितता..आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सोयीसुविधा असा भक्कम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
थर्टी फर्स्टला..उन्हाळ्याच्या सूट्टींमध्ये ‘हाऊसफुल्ल’ होणारं गोवा आणि ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ..ऐनवेळी ठरलेली ट्रीपची प्लॅनिंग्ज् वगैरे..या सर्वांना ‘सिंधुदुर्ग पर्यटना’मूळे एक हक्काचा मार्ग मिळाला आहे.
जिल्ह्यातील सर्वचं पर्यटनस्थळे याबाबतीत आघाडीवर असून त्यामध्ये ‘मालवण’चं नाव निश्चितचं अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
‘मालवण’ला जेंव्हापासून पर्यटनाचं महत्व लक्षात आलं तेंव्हापासून ‘मालवण’ने आपल्या परिसरात आपल्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला आहे.
त्यामध्ये ‘मालवण’वासियांची मानसिकता व कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. ‘अतिथी देवो भव’ हे ब्रीद केवळ ‘पाटी’वर लटकण्यापूरतं मर्यादित न राहता किना-यालगतच्या वस्ती वाड्यांनी आपली राहती घरे ‘गेस्ट् हाऊस्’..’रेस्ट् हाऊस्’मध्ये बदलून तीथे पर्यटकांची सोय करून दिली आहे. स्वतः मात्र त्याच जागेत छोटे छोटे तंबू बनवून राहत आहेत. पण पर्यटकांची ‘निवासा’ची..आणि ‘न्याहारी’ची चोख व्यवस्था बजावत आहेत. ते ही -वाजवी दरात’.
म्हणूनच मग मध्यमवर्गीय माणसाला..पर्यटकांना..कुटूंबासहित ‘कोकण दर्शन’.. ‘परवडेबल’ झालं आहे.
फक्त त्यासाठी आवश्यकता आहे ती..पर्यटक म्हणून काही खबरदारी घेण्याची..शिस्त पाळण्याची.
आपल्याला फिरायला घेऊन जाणा-या बोटीची काही कमाल प्रवासी मर्यादा असते..त्या बोटमध्ये बसताना तोल जाऊ नये म्हणून बसण्याची एक ‘सिस्टीम’ असते..सिंधुदुर्ग किल्ला पहायला जातनाचा बोटीने प्रवास..स्कूबा डाइव्हला जातानाचा बोटीने प्रवास..आणि प्रत्यक्ष मासेमारी अनुभवण्यासाठी जातानाचा बोटीने प्रवास..या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामूळे प्रत्येक स्टेपबरोबर स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी ही वाढत जाते. त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या..व शारिरीकदृष्ट्या ‘तयार’ असणं गरजेचं आहे. तरच या सर्वाचा आनंद लूटता येऊ शकतो.
कुठेतरी सोशल मिडीयावरचं वाचनात आल होतं कि..संपूर्ण सिंधुदुर्ग परिसरात फिरताना ‘पोलीस कुमक’ फार कमी प्रमाणात दिसते किंवा दिसतचं नाही.
मग तर त्यांना अभिमानाने सांगावस वाटतं..हा सिंधुदुर्ग आहे..आणि तो पूर्णतः सुरक्षित आहे. त्यामूळे पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी आहे.
पर्यटकांना पोलीसांकडून थांबवून तपास केला जातोय..त्रास दिला जातोय असं चित्र इथे दिसतं नाही. चोरीमारीचे प्रकार होताना दिसत नाही. महिलांना देखील पर्यटनादरम्यान सर्वत्र सुरक्षितपणे संचार करता येतो. या सर्वाचं गुपित आमच्या सिंधदुर्गच्या ‘सुसंस्कृतपणात’ दडलेलं आहे.
म्हणून पर्यटनकाळात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नसणे..आणि पर्यटकांना मोकळेपणाने पर्यटनाचा आनंद लूटता येणे हे देखील सिंधुदुर्ग ‘सुरक्षितचं’ असण्याचं द्योतक आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
उन्हाळ्याची सूट्टी संपलीय..
‘पावसाळी पर्यटना’ला लवकरचं सुरूवात होईल..
नक्की या..पर्यटनाचा आनंद लूटा..
स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या..
आपण निसर्गाला जपलं..तर निसर्ग आपल्याला जपेल..
बाकि कसला किंतू..परंतू मनात बाळगू नका..
कारण..
येवा..सिंधुदुर्ग ‘सुरक्षितंच’ आसा..!!
==/==/===
देवेंद्र गावडे
उपसंपादक
आपली सिंधुनगरी चॅनेल
सिंधुदुर्ग.
==/==/===/====◼️◼️
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)