शिरवल ग्रामपंचायत आणि संकल्प ग्रामसंघ यांनी राबविलेला मोफत चष्मा वाटप उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद : प्रकाश पारकर
कणकवली / उमेश परब – शिरवल ग्रामपंचायत आणि संकल्प ग्रामसंघ शिरवल यांनी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन अनेक गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्मा उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांची दृष्टीदोषाची समस्या मार्गी लागली आहे.तुम्ही राबविलेला हा एक चांगला स्तुत्य उपक्रम असुन निश्चितच कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी काढले.
ते शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत चष्मा वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी उपसभापती प्रकाश पारकर आणि पं.स.सदस्य मिलिंद मेस्त्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत चष्मे वाटप आणि शिरवल ग्रामपंचायत मार्फत आरोग्य उपकेंद्र शिरवल साठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजर मशीन प्रदान करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, सरपंच महेश शिरवलकर,शशिकांत राणे, पंढरी शिरवलकर, ग्रामसेवक राजेंद्र गुरव, पोलिस पाटील विजय शिरवलकर, संकल्प ग्रामसंघ अध्यक्षा रसिका शिरवलकर, सचिव तनिष्का कुडतरकर, सुप्रिया तांबे,सारीका गुरव, प्रज्ञा मेस्त्री, ग्रा.पं. सदस्य प्रणाली कासले, आशा सेविका मेघना पांचाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पारकर म्हणाले कि, मोफत चष्मा वाटप उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत एक चांगला आदर्श शिरवल ग्रामपंचायत आणि संकल्प ग्रामसंघ यांनी समाजासमोर ठेवला आहे. वीज, पाणी रस्ते ,या गोष्टी शासन स्तरावर होत असतात.मात्र चष्मा वाटप सारखे उपक्रम राबवून गोरगरिबांची जाणीव अशा कार्यक्रमांमधून आपण ठेवली आहे .याचे वेगळे समाधान वाटते.निश्चितच गावचा विकास या कामांमध्ये पण आहे.
परमेश्वर सदैव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी असतो चांगल्या कर्मामध्ये भगवंत आहे .दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर भयानक संकट आले आहे. कोराणामुळे मंदीरे बंद होती.भगवंत मंदिरातून बाहेर पडून पोलिसांच्या रुपात , डॉक्टरच्या, आरोग्य सेविकांच्या, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांच्या रुपामध्ये भगवंत प्रत्येक गावागावात जाऊन कार्य करत होता. तो भगवंत .भगवंत वेगळा कोणता नाही आहे. जिथे जिथे अडचण असते तिथे जी व्यक्ती धावून येते त्यांच्या मध्ये साक्षात परमेश्वर असतो असेही पारकर यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्य मिलिंद पारकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, रस्ते ,पाणी, वीज, शाळा या विकासाच्या आतापर्यंतचा मुलभूत गरजा समजल्या जायच्या. पण कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य या प्रत्येक क्षेत्रात ज्यावेळी विकास होतो त्यावेळीच त्या गावचा सर्वांगीण विकास होतो. संकल्प ग्रामसंघ शिरवल आणि शिरवल ग्रामपंचायत यांच्यावतीने गद्रे नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने शिरवल सरपंच महेश शिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करुन आणि आज या शिबिराच्या माध्यमातून चष्मा वाटप करुन स्तुत्य उपक्रम राबविला आहे.गावच्या विकासात्मक कामाचाच हा एक भाग आहे असे ते म्हणाले. शिरवल गावातील गरजू ,होतकरु, लाभार्थ्यांना चष्मा वाटप करून चांगले दृष्टी देण्याचे काम केलेले आहे. निश्चितच हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
शिरवल सारख्या ग्रामीण भागात ५८ लाभार्थ्यांना चष्मा वाटप करुन तसेच एका लाभार्थ्याची नेत्र शस्त्रक्रिया करुन त्याला दृष्टी देण्याचे पवित्र काम शिरवल ग्रामपंचायत आणि संकल्प ग्रामसंघ शिरवल यांनी केले आहे. आमदार नितेश राणे , जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , कणकवली पंचायत समिती यांच्या माध्यमातून गावांमध्ये विविध योजना सरपंच महेश शिरवलकर प्रामाणिक पणे राबवीत आहेत.आतापर्यंत ग्रामपंचायतीमार्फत विविध योजना राबवून गावच्या विकासामध्ये चांगले योगदान दिले आहे.
संकल्प ग्रामसंघ शिरवलच्या माध्यमातून गावांमध्ये आठ महिला बचत गट कार्यरत आहेत. ही बाब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने निश्चितच चांगली आहे. बचत गट नावापुरतेच राहता कामाने यासाठी शासनाच्या विविध योजनांचा आणि अनुदानाचा पुरेपूर तुम्ही फायदा करुन घ्या. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्यासाठी कणकवली पंचायत ,समिती जिल्हा परिषद आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जे सहकार्य लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. बचत गटाच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.अशी ग्वाही पं.स.समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी दिली.
शिरवल सरपंच महेश शिरवलकर म्हणाले की, शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कणकवली पंचायत समिती यांच्या माध्यमातून विविध योजना राबवून गावचा सर्वांगीण विकास साधणार आहोत. गावातील महिलांच्या बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रम घेऊन याचा लाभ गावातील ग्रामस्थांना मिळण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन गावच्या उन्नतीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
आज मोफत चष्मा वाटप उपक्रम राबविण्यात आला आहे. यापुढे गावात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्याचा आपला मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शिरवल ग्रामपंचायत मार्फत आरोग्य उपकेंद्र शिरवल साठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजर मशीन आशा सेविका मेघना पांचाळ यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली असल्याचे यावेळी सरपंच शिरवलकर यांनी सांगितले.यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित राहुन चष्मा वाटपाचा लाभ घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)