दक्षिण कोकणचा धार्मिक जिव्हाळा श्री कुणकोबा.( विशेष )
११ व्या शतकापासून अतिप्राचीन ऐतिहासिक व धार्मिक तीर्थक्षेत्र.
शिरगांव /संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी आणि देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री या दोन मोठ्या यात्रा मानल्या जातात.त्यापैकी श्री भराडीदेवीची यात्रा नुकतीच संपन्न झाली तर आज १ मार्च व २ मार्च या दोन दिवसात श्री क्षेत्र कुणकेश्वर ची यात्रा सुरू झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो-कोटींची उलाढाल होणार आहे.
या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांची श्री कुणकोबाच्या दर्शनासाठी रांग लागलेली दिसते.अतिशय भक्तीभावाने भाविक उपस्थित राहतात.यंदा एसटीचा संप अजून मिटलेला नसल्याने भाविकांना दर्शनाला येताना थोडी गैरसोय होत असली तरी काही राजकारण्यांनी तसेच समाजसेवकांनी भाविकांसाठी मोफत एसटी बसेस सुरू केल्या आहेत.मात्र ग्रामीण भागातील भाविकांना मात्र स्वखर्चाने खाजगी वाहनानेच यावे लागणार आहे.
अतिप्राचीन काळापासून कणकेच्या बेटात आणि अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला शंभू महादेवाची ही पवित्र भूमी. कणकेच्या बेटात वसलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर असे नाव प्रचलित झाले आहे. सुमारे ११ व्या शतकापासून हे कोकणातील अतिप्राचीन ,ऐतिहासिक आणि धार्मिक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.
या मंदिराबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात.या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र पदस्पर्श लाभलेले आहे. या मंदिराच्या बाजूला समुद्रात शिवलिंगे वसलेली आहेत.या शिवलिंगावर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा असतो. तरीही ही शिवलिंगे झिजलेली नाहीत.या मंदिराचे बांधणी ही द्राविडी (दाक्षिणात्य) पद्धतीची असून पाया ग्रॅनाईट दगडाने बनवलेला आहे. उंची सुमारे ७० फूट आहे.मंदिराचे अधिष्ठान तारकाकृती असून त्यावर मंदिराचे कळसापर्यंतचे बांधकामही तारकाकृतीचे आहे. या मंदिराच्या परिसरात श्री जोगेश्वरीचे,श्री देव मंडलिक नावाचे एक शिवालय,श्री नारायण मंदिर,श्री गणेश मंदिर,श्री भैरव मंदिर आदी आहेत.ईशान्य कोपऱ्यात एक गोड्या पाण्याची विहीर असून जोगेश्वरी मंदिराच्या बाजूने आवाराच्या उत्तर दरवाजाने बाहेर पडले असता नव्याने सुशोभित केलेला प्राचीन तलाव आहे.त्यावर शिवशंकराची देखणी मूर्ती स्थापन केली आहे.या मंदिराचा सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे.या मंदिराचा इतिहास प्राचीन,रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.विजयदुर्ग येथून सुरुवात होणारा सागरी महामार्ग हा कुणकेश्वर गावातून जातो.याठिकाणी येण्यासाठी मिठबाव आणि देवगड येथून दोन रस्ते असून हे कुणकेश्वर मंदिरासमोरील पाराजवळ एकत्र मिळतात.याठिकाणी होळीचा मांड आणि महापुरुषांचे स्थान आहे.शिमगोतस्वाच्या सांगतेला कुणकेश्वरला पालखीत बसवून याठिकाणी आणतात.याठिकाणी भाविकांना राहण्यासाठी श्री कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट मार्फत भक्तनिवासाची सोय उपलब्ध आहे.या मंदिराचा उल्लेख स्कंध पुराणात आणि संगमेश्वर महात्म्यातही आला असल्याचे सांगितले जाते.
या यात्रेच्या निमित्ताने असंख्य कापडाची,खेळण्यांची,खाजा-मिठाई,आकाशपाळणे अशी विविध दुकाने थाटलेली बघावयास मिळतात.
गेले दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा भरली नसली तरी यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळून ही यात्रा भरणार आहे.त्यामुळे भाविकांमध्ये भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)